अबब! पालखी मार्गावर १७८ खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 01:34 AM2018-08-26T01:34:45+5:302018-08-26T01:35:10+5:30
रस्त्याची चाळण : पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी चालकांना त्रास
देहूरोड : देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावर देहूरोड लष्करी हद्दीत अशोकनगर-चिंचोलीपासून ते झेंडेमळादरम्यानच्या रस्त्यावर पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. अशोकनगर (चिंचोली) ते झेंडेमळादरम्यानच्या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर १७८ धोकादायक खड्डे पडले असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. याच भागातील कॅन्टोन्मेंटचे बहुतांशी पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मोठी गैरसोय होत असून, वाहने आदळण्याचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याची दुरुस्ती नक्की कधी आणि कोण करणार, असा सवाल स्थानिकांसह, तळवडे येथील आयटी पार्कमध्ये जाणारे त्रस्त अभियंते करीत आहेत.
देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील देहूरोड ते झेंडेमळादरम्यानचा रस्ता केंद्रीय आॅर्डनन्स डेपोच्या प्रवेशद्वारापर्यंत (सीओडी) देहूरोड लष्करी अभियांत्रिकी (एमईएस) या विभागाच्या ताब्यात असून, त्यांच्यामार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यात येते. तसेच झेंडेमळा (कॅन्टोन्मेंट हद्द) ते केंद्रीय आॅर्डनन्स डेपो प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याची देखभाल दुरुस्ती गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येते. जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यापासून या दोन्ही भागातील रस्त्यावर लहान मोठे १७८ खड्डे पडले असून, अडीच महिन्याच्या काळात एकही खड्डा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या रस्त्यावरून तळवडे आयटी पार्ककडे ये-जा करणारी अभियंत्यांसह अधिकाऱ्यांच्या चारचाकी खासगी मोटारी, चाकण एमआयडीसीकडे ये-जा करणारी वाहने तसेच देहूगाव पंचक्रोशीतील पंधरा वीस गावांतील वाहने व देहूगाव येथे संत तुकाराममहाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून येणाºया भाविकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र पालखी सोहळ्याच्या वेळी रस्त्याची किरकोळ डागडुजी करण्यात येते. यावर्षी तर पालखी सोहळा वारीहून परत येऊन सोळा दिवस उलटले असतानाही या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी येथून नियमित ये-जा करणारे वाहनचालक तसेच भाविक त्रस्त झाले आहेत.
अशोकनगर-चिंचोली भागात सर्वाधिक खड्डे पडले असून, या रस्त्यावर वाहनांची सर्वाधिक वर्दळ असल्याने रस्त्यावरील खड्डे चुकविणे अनेकदा शक्य होत नाही. त्यातच चिंचोली ते आर्मी स्कूलदरम्यानच्या एक किलोमीटर भागात फक्त दोनच पथदिवे लागत असून, इतर दिवे बंद असल्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत माहिती घेतली असता एलईडी दिवे बसविण्यात येणार असल्याने जुने दिवे दुरुस्ती करण्यात आले नसल्याचे समजते. मात्र सध्या तरी रस्त्यावर अंधार असल्याने वाहनचालकांना नाईलाजास्तव खड्ड्यांत वाहने घालावी लागत आहेत. त्यामुळे वाहने आदळून नुकसान होत असून, खड्ड्यांची लांबी रुंदी दिवसागणिक वाढत चालली आहे.