कुलरच्या गारव्यातच प्रेक्षक ‘अ’समाधानी
By admin | Published: June 20, 2016 12:49 AM2016-06-20T00:49:31+5:302016-06-20T00:49:31+5:30
शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिराची पाहणी लोकमततर्फे करण्यात आली. या वेळी रंगमंदिरात बऱ्याच ठिकाणी डागडुजीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले
पिंपरी : शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिराची पाहणी लोकमततर्फे करण्यात आली. या वेळी रंगमंदिरात बऱ्याच ठिकाणी डागडुजीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वातानुकुलित सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रेक्षकांना कुलरच्या गारव्यात समाधान मानावे लागत आहे.
अत्रे रंगमंदिरात साधारण आठशे आसनव्यवस्था आहे. त्यातही पन्नास खुर्च्या मोडकळीस आल्या आहेत, तर काहींची अवस्था खराब झाल्याने आहे त्या जागीच बाद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ७५० आसन व्यवस्थाच गृहीत धरली जाते, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. बाल्कनीतील आसनांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्यातील एकाच रांगेतील सुमारे चार ते पाच खुर्च्या कुशन खराब झाल्याने मोडकळीस आल्या आहेत. समोरील भागातील १५० खुर्च्यांचे नूतनीकरण झाले आहे.
आचार्य अत्रे रंगमंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या ठिकाणी संत तुकारामनगर, वल्लभनगर परिसर जोडलेला आहे. वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या या नाट्यगृहात मनुष्यबळ, सीसीटीव्ही कॅमेरा, अग्निशामक सुविधा, पे अँड पार्क, आसन व्यवस्था, स्वच्छतागृह आदी पाहणी करण्यात आली. या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था अपुरी आहे. रंगमंचाच्या एकाच बाजूकडील असलेल्या स्वच्छतागृहात चार कक्ष आहेत. त्यातही स्वच्छतागृहांच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे एकच युनिट आहे, तसेच एअर कंडिशनिंगचीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रेक्षकांना कुलरच्या गारव्यात समाधान मानावे लागत आहे.
अलीकडेच नूतनीकरण झाल्याने अग्निशामक सुविधा चांगल्या स्थितीत असल्याचे आढळले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत सभोवतालचा परिसर, प्रवेश कक्ष ते प्रेक्षागृहातील हालचाली टिपल्या जातात.
त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत रंगमंदिर उजवे ठरले आहे.(प्रतिनिधी)