उर्वशी रौतेलाचा कार्यक्रम रद्द झाल्याने प्रेक्षकांचा चढला पारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:43 PM2020-01-02T14:43:39+5:302020-01-02T14:47:53+5:30
९९९ रुपयांपासून ते थेट ३० हजार रुपयांपर्यंतची तिकिटे
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी खराडी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड सिनेअभिनेत्री उर्वशी रौतेलाला बोलावण्यात आले होते. त्यासाठी ९९९ रुपयांपासून ते थेट ३० हजार रुपयांपर्यंतची तिकिटे ठेवण्यात आली होती; परंतु, आयोजकांचे ढिसाळ नियोजन आणि पोलिसांनी नाकारलेली परवानगी यामुळे हा कार्यक्रमच होऊ शकला नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी आयोजकांवर संताप व्यक्त केला.
नववर्षाच्या स्वागताकरिता सर्वत्र जय्यत तयारी केली जाते; तसेच पुण्यातील कोरेगाव पार्क, मुंढवा, खराडी, हिंजवडी आदी परिसरामध्ये पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी आॅनलाइन तिकीटविक्री करण्यात आली होती. साधारणपणे ९९९ रुपयांपासून ३० हजार रुपयांपर्यंत तिकिटे ग्राहकांनी खरेदी केलेली होती. परंतु, उत्साहाने या कार्यक्रमाची वाट पाहणाºया प्रेक्षकांचा मात्र हिरमोड झाला. याबद्दल काही प्रेक्षकांनी ‘लोकमत’च्या कार्यालयात दूरध्वनीद्वारे तक्रारी केल्या.
दरम्यान, दर वर्षी कोरेगाव भीमाला अभिवादन कार्यक्रम होतो, या भागातील रस्ते बंद केले जातात याची माहिती आयोजकांना नव्हती का, तसेच आयोजकांनी पोलिसांना परवानगीकरिता उशिरा कागदपत्रे का दिली? असे प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केले जात आहेत.
......
ग्राहकांना आठ दिवसांत पैसे परत देणार
पोलिसांनी या कार्यक्रमाला ऐनवेळी परवानगी नाकारल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता मंगळवारी सायंकाळी सहानंतर या भागातील रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. हा कार्यक्रम काही दिवसांनंतर घ्यावा की न घ्यावा, यासंदर्भात इव्हेंट कंपनी निर्णय घेणार असली, तरी प्रेक्षकांना मात्र त्यांचे पैसे कधी परत मिळणार? अशी विचारणा होत आहे. दरम्यान, आॅनलाइन तिकिटे दिलेल्या पेमेंट कंपन्या ग्राहकांना त्यांचे पैसे रिफंड करणार आहेत. येत्या आठ दिवसांत हे पैसे परत मिळतील. तसे मेसेज ग्राहकांना पाठविण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.