खुल्या रंगमंचावरील जिवंत प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:58+5:302021-01-10T04:08:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नाटक, स्टँडअप कॉमेडी आणि गाण्यांच्या मैफिलीचे खुल्या रंगमंचावर एक, दोन प्रयोग झाले. त्यानंतर नाट्यगृह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नाटक, स्टँडअप कॉमेडी आणि गाण्यांच्या मैफिलीचे खुल्या रंगमंचावर एक, दोन प्रयोग झाले. त्यानंतर नाट्यगृह आणि सभागृहात नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आणि नाट्यगृहांकडूनही तिकीट विक्रीचे सकारात्मक चित्र दिसून आले आहे.
डिसेंबर महिन्यात नाट्यगृह आणि सभागृहाना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी परवानगी मिळाली. नाट्यगृहातही प्रसिद्ध नाटकांचा श्रीगणेशा झाला. लहान-मोठ्या सभागृहातही स्टँड-अप कॉमेडी, जादूचे प्रयोग होऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि कलाकारांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.
नाट्यकर्मी सतीश आळेकर म्हणाले की, प्रेक्षक सिनेमा पाहायला जात नाहीत. परंतु नाटकासाठी उत्सूक आहेत. जिवंत प्रेक्षक आणि जिवंत नट यांचे वेगळेच नाते असते. मी दिग्दर्शित केलेल्या नाटकाचे प्रयोग लहान सभागृहातही होत असतात. त्याठिकाणीही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे.
..............................................................
कार्यक्रम होण्याअगोदर थोडी धाकधूक होती. मैफिलीच्या ठिकाणी लोकांनी खबरदारी घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. ऑनलाइन कार्यक्रमात कलाकार आणि प्रेक्षक दोघांमध्येही उत्सुकता दिसून येत नाही. खुल्या रंगमंचावरच प्रेक्षकांची दाद अनुभवता येते.
-सुयोग कुंडलकर, हार्मोनिअम वादक
...............
खुल्या रंगमंचावर नाटकाचे चार प्रयोग केले. ते सर्व हाऊसफुल होते. ५० टक्के क्षमतेतही प्रेक्षकांचा प्रतिसाद दिसून आला. जिवंत प्रयोग पाहण्यातच प्रेक्षकांना आनंद घेता येत आहे.
-शिवराज वायचळ, अभिनेता
...............
प्रेक्षकांना हसायला खूपच आवडत असते. स्टँडअप कॉमेडीमधून आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. आठ महिन्यांनी थिएटरमध्ये स्टँडअप करण्याची संधी मिळाली आहे. तिकीट विक्री पाहता प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे.
-यश रुईकर, कलाकार
चौकट
भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बालगंधर्व रंगमंदिर येथील तिकीट विक्रेत्यानी सांगितले की, नाट्यगृहांच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के आसनव्यवस्थेला परवानगी देण्यात आली. त्यात सही रे सही, एका लग्नाची पुढची गोष्ट ही नाटके ‘हाऊसफुल’ होती. इतर नाटक आणि गाण्यांच्या मैफिलीला ७० टक्के लोकांचा प्रतिसाद दिसून आला. मात्र प्रेक्षक वाढत चालला आहे.