‘इ-फ्लिप’ बुकमध्ये साहिर लुधियानवी यांच्या गीतांचा दृकश्राव्य अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:49+5:302021-05-20T04:10:49+5:30
यापूर्वी सांगीतिक पुस्तकामध्येच स्कॅन कोड देऊन गीते ऐकण्याची संधी वाचकांना मिळाली आहे. मात्र साहित्य विश्वाने तंत्रज्ञानात आणखी पुढचे ...
यापूर्वी सांगीतिक पुस्तकामध्येच स्कॅन कोड देऊन गीते ऐकण्याची संधी वाचकांना मिळाली आहे. मात्र साहित्य विश्वाने तंत्रज्ञानात आणखी पुढचे पाऊल टाकत पुस्तकामधून गीतांचा दृकश्राव्य अनुभव देण्याचा पहिलाच प्रयोग साकारला आहे. या प्रयोगाविषयी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं की, मी आणि आनंद मोकाशी दोघे मिळून साहिर लुधियानवी यांच्या गाण्यांचे कार्यक्रम करीत होतो. गेल्या वर्षी भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील गीतकार साहिर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम करण्याची इच्छा होती. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे कार्यक्रम करता आला नाही. साहीर इतका मोठा गीतकार होता की, आजही त्यांच्या गीतांची जादू ओसरलेली नाही. त्यामुळे नवीन पिढीला साहीर कसा समजावून सांगू शकू असं वाटलं, त्यातून दोन उपक्रम केले. एक आनंद मोकाशी यांनी साहिर यांच्या गीतांचे व्हिडीओ यूट्यूबवर टाकले आणि मी साहीर यांची 100 गाणी निवडून ती साहिरप्रेमी मंडळींच्या विविध ग्रुपवर शेअर केली. सलग 100 दिवस हा उपक्रम राबविला. माझ्या शिष्याने या गीतांचे ’इ-बुक’ करण्याची कल्पना मांडली. हे करताना लक्षात आलं की याचे ‘र्इ फ्लिप बुक’ करता येईल, ज्यातून वाचकांना पान उलटण्याचा भास होईल. त्यातूनच हे आगळेवेगळे ‘फ्लिप बुक’ साकार झाले. या पुस्तकाला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. हे पुस्तक वाचायला वाचकांना कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागत नाही. पान उलटले की पुढचे गाणे वाचता आणि ऐकता येते. हे ‘र्इ बुक’ निशुल्क आहे.
-----------------------------------
या इ-बुकचे वैशिष्ट्य म्हणजे, या इ-बुक’ मधील प्रत्येक गाण्याच्या शेवटी यूट्यूबची एक लिंक देण्यात आली असून, वाचकांना प्रत्येक गीताचा दृक-श्राव्य आस्वाद घेण्याची संधी देण्यात आली आहे. साहित्य विश्वात साकार झालेला हा आगळावेगळा प्रयोग सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे. या गीतांचा आनंद लुटताना ज्येष्ठ साहिरप्रेमी ‘नॉस्टेल्जिक’ होत आहेत.
- धनंजय कुलकर्णी