धर्मादाय संस्थांच्या ‘ऑडिट’ला राहिले पाचच दिवस; हिशोबपत्रके मुदतीत सादर करण्याची शेवटची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 07:22 PM2021-01-25T19:22:39+5:302021-01-25T19:24:22+5:30
अनलॅाक नंतरही अनेक संस्थांना आपले हिशोब सनदी लेखापालांकडून तपासून घेता आले नव्हते.
पुणे : दरवर्षी नियमानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर १ एप्रिलपासून सहा महिन्यात म्हणजे ३० सप्टेंबर पर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण केलेले ताळेबंद धर्मादाय संस्थांनी सादर करायचे असतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक संस्थांना आपली हिशोबपत्रके वेळेत तयार करता आली नाहीत. अनलॅाक नंतरही अनेक संस्थांना आपले हिशोब सनदी लेखापालांकडून तपासून घेता आले नव्हते. त्यामुळे ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर व आता ‘अंतिमत:’ ३१ जानेवारी पर्यंत हे हिशोब सादर करण्यास राज्याचे धर्मादाय आयुक्त रा. ना. जोशी यांनी मुदतवाढ दिली आहे. धर्मादाय संस्थांना आपली हिशोबपत्रके मुदतीत सादर करण्याची ही शेवटची संधी आहे.
महाराष्ट्रातील सर्व धर्मादाय संस्था व ट्रस्टना ३१ मार्च २०२० अखेरच्या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण (ऑडिट) केलेले ताळेबंद (बॅलेन्स शीट) धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करून त्याच्या पोचपावतीसह ताळेबंदाच्या प्रती स्थानिक धर्मादाय आयुक्तालयात दाखल करण्यासाठी आता केवळ पाचच दिवस राहिले आहेत.
धर्मादाय संस्थांना गेल्या वर्षातील आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षणाचे ताळेबंद ऑनलाइन पद्धतीने धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावर अपलोड केल्यावर त्याची पोहोच मिळते. त्यानंतर ही पोहोच व त्यासोबत अनुसूची ‘९ ड' नुसार सर्व विश्वस्तांचे पॅन क्रमांक देणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, ट्रस्टला मिळणाऱ्या देणग्यांबाबतचे सर्व स्रोत व त्याचा विनियोग न्यासाच्या उद्धिष्टपूर्तीसाठीच होत आहे असे नमूद केलेले सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.
————————————————
प्राप्तिकर विभागानेही वार्षिक अहवाल दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती. त्यास अनुसरून ज्या ट्रस्टना आपले वार्षिक हिशोबपत्रकांचे सनदी लेखापालकांकडून लेखापरीक्षण करणे अनिवार्य आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घोषित झालेल्या लॅाकडाऊन मुळे ज्या विश्वस्त संस्थांना लेखापरीक्षण सादर करणे अशक्य झाले होते अशा संस्थांनी धर्मादाय आयुक्तालयाने दिलेल्या या अंतिम मुदतवाढीत आपले लेखापरिक्षित ताळेबंद सादर करून पुढील दंडात्मक कारवाई टाळावी- ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार
विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे