मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 08:34 AM2024-11-05T08:34:41+5:302024-11-05T08:35:00+5:30
Pune University News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊ दिला जात नाही, अशी तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली होती.
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एका महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊ दिला जात नाही, अशी तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली होती. त्यावर महाविद्यालयाच्या चौकशीसाठी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर तालुक्यातील एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मराठी विषय घेण्यापासून रोखले जात असल्याचे लेखी पत्र विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. त्यावर विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन केली होती. परंतु, या समितीतील काही सदस्यांनी वैयक्तिक कारणास्तव या समितीत काम करणे शक्य नसल्याचे विद्यापीठाला कळवले. त्यामुळे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाने समिती स्थापन केली आहे.
अहवाल त्वरित देण्याचे आदेश
कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील मराठी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. प्रतिभा घाग यांना विषयाचा कार्यभार कमी झाल्याचे सांगून कोणतीही पूर्वसूचना न देता सेवेतून बडतर्फ केलेले दिसून येत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी महाविद्यालय मराठी विषय जाणीवपूर्वक घेऊ देत नसल्याबाबत तक्रार केली आहे. याबाबतची सत्यता तपासण्यासाठी विद्यापीठातर्फे समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षांनी प्रत्यक्ष महाविद्यालयास भेट देऊन वस्तुनिष्ठ अहवाल विद्यापीठाला त्वरित सादर करावा, असे पत्र विद्यापीठातर्फे काढण्यात आले आहे.