लेखापरीक्षकाचा फॉरेन्सिक रिपोर्ट, हेमंती कुलकर्णींकडून पोलिसांनी जुजबी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 08:08 PM2018-02-19T20:08:14+5:302018-02-19T20:09:07+5:30
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत त्यांनी पोलिसांना आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती न देता केवळ जुजबी माहिती पुरविली. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना त्रास झाल्याने रविवारी प्रथम ससून रुग्णालयात व त्यानंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत त्यांनी पोलिसांना आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती न देता केवळ जुजबी माहिती पुरविली.
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना त्रास झाल्याने रविवारी प्रथम ससून रुग्णालयात व त्यानंतर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याची न्यायालयाला विनंती केली होती. त्याचवेळी त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची पोलीस कोठडी कायम आहे. पोलिसांनी सोमवारी त्यांच्याकडे विविध माहिती विचारली़ मात्र, त्यावर त्यांनी जुजबी स्वरुपाची माहिती दिली.
पुणे पोलिसांनी सुरुवातीला डी. एस. कुलकर्णी यांच्या घरी, कार्यालयांवर छापे घालून विविध कागदपत्रे जप्त केली होती. त्याची तपासणी करण्यासाठी व डी. एस. कुलकर्णी यांनी विविध कंपन्यांमार्फत स्वीकारलेल्या ठेवींच्या रकमा कोठे कोठे गेल्या, काय व्यवहार झाले, याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. त्यांच्या फॉरेन्सिक आॅडिट रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांनी नावात छोटे छोटे बदल करून एकूण ५९ कंपन्या स्थापन केल्या व त्याद्वारे लोकांकडून ठेवी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. याशिवाय त्यांनी अनेकांकडून सुमारे ३५ कोटी रुपयांची वैयक्तिक कर्जेची घेतली आहेत. ठेवी व ही असुरक्षित कर्जे मिळून एकूण १ हजार १५३ कोटी रुपये त्यांनी स्वीकारले आहेत. याशिवाय विविध बँकांची त्यांच्या २ हजार ८९२ कोटी रुपयांची कर्जे आहेत. याशिवाय ज्या लोकांनी फ्लॅट बुक केले. त्यांनी भरलेले पैसे व घेतलेली कर्जे यांची रक्कम वेगळी आहे. न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांनाही चौकशीसाठी पोलिसांकडे ४ दिवस हजेरी देण्यास सांगितले आहे. त्यांनीही पोलिसांना तपासात काही सहकार्य केले नाही. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना सांगता येत नाही हे पाहून सांगतो, अशी उत्तरे दिली आहेत. शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २२ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होणार आहे.
डी. एस. के. यांची प्रकृती स्थिर
दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या डी. एस. कुलकर्णी यांची प्रकृती आता स्थिर आहे. रविवारपेक्षा सोमवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. याबाबत डॉ. व्ही. एन. जगताप यांनी सांगितले की, त्यांना ससून रुग्णालयात लावलेला व्हेटिंलेटर रविवारी दुपारीच काढण्यात आला होता. सध्या त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत आहे. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या, त्याला अनुसरुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी डॉक्टरांची मेडिकल टीम त्यांची तपासणी करेल व त्याच्या प्रकृतीचा अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. त्या अहवालावरून न्यायालय पुढील निर्णय घेईल.