औंध जकात नाक्याची जागा पीएमपीसाठी : स्थायी समितीने दिली मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 10:30 PM2019-12-31T22:30:00+5:302019-12-31T22:30:02+5:30
पाच वर्षांचा भाडेकरार, दरमहा आकारणार ५ लाख ७६ हजार ४७० रुपये
पुणे : शहरात पीएमपी बसची संख्या वाढत असतानाच या बसेस लावायच्या कुठे असा मोठा प्रश्न आहे. बहुतांश गाड्या या रस्त्यांवर रात्रीच्यावेळी उभ्या केल्या जातात. त्यातच नविन इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंग स्टेशनचाही प्रश्न आहेच. त्यामुळे पीएमपीने यावर मार्ग काढण्याकरिता पालिकेकडे औंध येथील जकात नाक्याची जागा पाच वर्षांकरिता भाडेकराराने मागितली आहे. त्याला स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी दिली. एकूण सात हजार २०३ चौरस मीटरची जागा दरमहा ५ लाख ७६ हजार ४७० रुपये दराने देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
औंध येथे पालिकेची ही जागा आहे. या जागेवर पुर्वी जकात नाका होता. जकात बंद झाल्यापासून ही जागा मोकळी आणि वापराविना पडून आहे. या जागेचा वापर पीएमपीएमएलसाठी होऊ शकतो; असा विचार करुन संचालक मंडळाने ही जागा देण्याची मागणी महापालिकेकडे केली. त्यावर पालिकेने या जागेचे दरमहा ५लाख ७६ हजार ४७० रुपये एवढे मुल्यांकन काढले. तसेच ही जागा पीएमपीएमएलसाठी पाच वर्षांसाठी देण्यासंदर्भात भाडे करार करण्यासाठी पालिका प्रशासनाने सहा महिन्याच्या भाड्याइतकी अनामत रक्कम (३४ लाख ५८ हजार ८५०) आणि एका महिन्याचे आगाऊ भाडे भरण्यास कळविले होते.
परंतू, सध्या पीएमपीची आर्थिक स्थिती ढासळलेली असून ४० लाख रुपये देणे शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिका पालिकेला देत असलेल्या संचलन तुटीच्या अनुदानातून ही ४० लाख रुपयांची रक्कम वजा करण्यात यावी असे पीएमपीएमएलला कळविण्यात आले. त्यावर आयुक्त सौरभ राव यांनी ही जागा पीएमपीएलला पाच वर्षांसाठी पाच लाख ७६ हजार ४७० रुपये भाडे कराराने देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर मंजुरीसाठी ठेवला. या प्रस्तावाला स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समिती हेमंत रासने यांनी सांगितले