Aurangabad Violence : अाैरंगाबाद हिंसाचारामधील दाेषींवर कडक कारवाई करु : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:22 PM2018-05-12T16:22:22+5:302018-05-12T16:29:38+5:30
अाैरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या हिंसाचाराबाबत बाेलताना, दाेषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे अाश्वासन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले अाहे.
पुणे : अाैरंगाबाद हिंसाचारामध्ये जे काेणी दाेषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यातील बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला केंन्द्र सराकरकडून जाहीर झालेल्या पाच काेटी रुपयांच्या निधीचा धनादेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात अाला त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बाेलत हाेते. तसेच औरंगाबाद शहरात शुक्रवारी मध्यरात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
औरंगाबादमध्ये शुक्रवारी (11 मे) मध्यरात्री दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामुळे तुफान हाणामारी झाली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन गटातील वादामुळे परिसरात जाळपोळ, तुफान दगडफेक करण्यात आली. मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट आपापसात भिडले. तलवारी, चाकू , लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. या घटनेत पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी वाहनांची, दुकांनाची तोडफोड-जाळपोळ केली. दरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला. यामध्ये एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, जमावानं केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 पोलीस जखमी झाले आहेत.