ढोल पथकामुळे गणेशोत्सवाला मांगल्याचे स्वरूप : मुरलीधर मोहोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:52 AM2018-01-22T11:52:18+5:302018-01-22T11:54:51+5:30
सामाजिक भावनेतून विविध उपक्रमात सहभागी होऊन समाजकार्यात भाग घ्यावा’, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केले. ‘स्वराज्य सन्मान पुरस्कार’ सोहळ्यात मोहोळ बोलत होते.
पुणे : ‘गणेशोत्सवात पाश्चिमात्य संगीताच्या नादावर, डीजेवर थिरकणारी तरुणाई आपण गेल्या काही वर्षांपूर्वी पाहत होतो. मात्र, ढोलताशा पथकांनी पारंपरिक वाद्यांतून गणेशोत्सवाला मांगल्याचे स्वरूप दिले आहे. ढोलताशा पथकांनी केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित राहू नये. सामाजिक भावनेतून विविध उपक्रमात सहभागी होऊन समाजकार्यात भाग घ्यावा’, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केले.
स्वराज्य ढोल पथकाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘स्वराज्य सन्मान पुरस्कार’ सोहळ्यात मुरलीधर मोहोळ बोलत होते. याप्रसंगी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष महेश लडकत, नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, ढोल ताशा महासंघाचे शिरीष थिटे, पथकाचे अध्यक्ष प्रसाद चिपाडे, मंदार राजवाडे, पराग काटे, रवी रोकडे, प्रेम क्षीरसागर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात जव्हार मोखाडा आदिवासी भागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ग्रामभारती समाज परिवर्तन संस्थेचे डॉ. पुरुषोत्तम आगाशे, आफ्रिका येथे ९ शिखरांवर सायकलस्वारी करून किलीमांजरो येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी जाणा-या अनिल वाघ यांना ‘स्वराज्य सन्मान पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी ग्रामभारती संस्थेला संगणक भेट देण्यात आला.
महेश लडकत म्हणाले, ‘ढोल पथकांच्या माध्यमातून चांगले सामाजिक कार्य उभा राहू शकते, हे स्वराज्य ढोल पथकाने दाखवून दिले आहे. या पथकाच्या स्थापनेपासूनच प्रवास मी पाहत आहे. ही तरुणमंडळी सुसंस्कृत आहेत. गणेशाची सेवा करण्याबरोबरच समाजाची सेवा करण्याची यांची भावना अतिशय प्रेरक आहे.’
शिरीष थिटे यांनीही मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद चिपाडे यांनी आभार मानले.
आदिवासी भागात कुपोषण, आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. त्यांच्या पदरी दारिद्र्य, गरिबी आणि बिकट जीवन आलेले आहे. त्यांच्या आयुष्यात थोडाफार बदल व्हावा, यासाठी गेली १८ वर्षे काम करीत आहे. तिथल्या मुलांना चांगले शिक्षण व इतर सोयी पुरविण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण युवकांनी ग्रामीण भागातील, आदिवासी पाड्यांतील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- डॉ. पुरुषोत्तम आगाशे
जगातील सर्व शिखरांवर शिवाजी महाराजांना घेऊन जायचे आहे. शिवप्रेमींनी या मोहिमेसाठी सहकार्य करावे. गिर्यारोहकांना प्रोत्साहित करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा.’
- अनिल वाघ