अस्सल झणझणीत मराठमोळा वडापाव! सोबत तळलेली मिरची, लालभडक चटणी, चिंचेचे आंबट-गोड पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 08:00 AM2024-08-23T08:00:00+5:302024-08-23T08:00:02+5:30
आधी वड्याचा घास नंतर पावाचा घास असा वडापावचा अपमान न करता पावात वडा बसवून खाणारा खरा खवय्या
राजू इनामदार
- दगडाधोंड्यांचा राकट देश असे महाराष्ट्राचे वर्णन कवींनी केले आहे. त्याच्याशी नाते सांगणारा खराखुरा अस्सल मराठी खाद्यपदार्थ कोणता? कोणी म्हणेल पुरणपोळी! असेलही; पण ती गोड, लुसलुशीत! तिचे नाते राकटपणाशी कसे असेल? कोणी म्हणेल मिसळ! तीही असेल; पण तिचा थाटमाटच जास्त. लिंबू पाहिजे, शेव पाहिजे, दही पाहिजे वगैरे वगैरे! खरे सांगायचे तर कुठेही, कसाही, केव्हाही हातात घेऊन खाता येणारा बटाटा वडा हाच अस्सल मराठमोळा पदार्थ आहे. त्याला पोर्तुगीजांच्या पावाची जोड काय मिळाली आणि वडापाव तयार झाला. त्याच्याबरोबर आली तळलेली हिरवी मिरची, आणखी लालभडक चटणीही! आणखी काही हवे असेल तर चिंचेचे थोडे आंबट-गोड असे पाणीही.
ही जी काय मजा आहे ती लिहिण्यात नाही, तर खाण्यात आहे. कल्पना करा, रस्त्याने जात आहात व कुठेतरी कोपऱ्यात एक गाडी लागली आहे. तिथे भल्यामोठ्या कढईत रटरटत्या तेलात बटाटा वड्याचा घाणा (घाणाच म्हणतात त्याला.) काढला जात आहे. त्याच्या केवळ वासावरून पोटातला अग्नी प्रदीप्त होतो. जिव्हारस पाझरू लागतो. मन त्या कढईकडे धाव घेऊ लागते व थोड्याच वेळात सदेह तिथे पोहोचतेही. मग जी काय झुंबड उडते तिला तोड नाही. उगीच नाही राज्यातील कोणत्याही शहरात, गावात वडापावच्या गाड्या लागत व त्यावर ग्राहकांच्या उड्या पडत?
वडापावमधील वडा हा अगदी १०० टक्के मराठी आहे. त्यावर इतर कोणताही प्रांत किंवा भाषा दावा करू शकत नाही. वडापाव हीसुद्धा मराठी माणसानेच गरजेपोटी केलेली नवनिर्मिती आहे. काहीजण आधी वड्याचा घास नंतर पावाचा घास असे काहीतरी विचित्रपणे खातात. त्याला काही अर्थ नाही. तो वडापावचा अपमान आहे. खरा खवय्या पावाच्या बरोबर मध्ये वड्याचा गोल बसवतो. त्याआधी पावाला दोन्ही बाजूंनी चटणी लावली की नाही तो पाहतो. मग एकत्रच एक घास घेतो. लगेचच तळून मीठ लावलेल्या हिरव्या मिरचीचा तुकडा तोडतो. एवढे झाले की, मग तो आजूबाजूला पाहतही नाही. लगेच दुसरा घास, मग तिसरा व त्यानंतर दुसऱ्या वडापावची मागणी.
अशा या वडापावचा म्हणे आज जागतिक दिवस आहे. असो! असा दिवस साजरा करावा, असा हा एकमेव पदार्थ आहे. तो साजरा करायचा म्हणजे नेहमीची आवडती गाडी गाठून तिथे दोन-चार वडापाव उदरस्थ करायचे. खाणाऱ्याला काय निमित्त हवेच असते.