पुण्यात अस्सल पंजाबी 'सरसोंका साग' आणि 'मकई की रोटी' खायचीये ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:10 PM2020-01-09T17:10:32+5:302020-01-09T17:16:50+5:30
पंजाबी जेवणात पनीरच्या पलीकडे क्वचितच मिळणारी ऑथेंटिक मोहरीची भाजी आणि मक्याची भाकरी अर्थात सरसोंका साग आणि मकई की रोटी मात्र ठराविक ठिकाणीच मिळते. चला तर जाणून घेऊया अस्सल पंजाबी जेवणाची मेजवानी मिळणारी ही पुण्यातली ठिकाणे.
पुणे : नोकरीच्या संधी आणि शैक्षणिक संस्था यामुळे पुणे शहर दिवसेंदिवस विस्तारत आहेत. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून इथे नागरिक स्थायिक होत असल्याने इथले जेवणही विविधतेने नटलेले दिसत आहे. बंगाली, आसामी, दाक्षिणात्य, पंजाबी अशा विविध राज्यातील पदार्थ पुण्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र पंजाबी जेवणात पनीरच्या पलीकडे क्वचितच मिळणारी ऑथेंटिक मोहरीची भाजी आणि मक्याची भाकरी अर्थात सरसोंका साग आणि मकई की रोटी मात्र ठराविक ठिकाणीच मिळते. चला तर जाणून घेऊया अस्सल पंजाबी जेवणाची मेजवानी मिळणारी ही पुण्यातली ठिकाणे.
- शहाजी पराठा हाऊस :
इथे हा पदार्थ गुळाचा खडा आणि मुळ्याच्या कोशिंबिरीसह सर्व्ह केला जातो. गरमागरम मक्याच्या भाकरीसोबत गूळ आणि मोहरीची भाजी म्हणजे चवीला जन्नत लागते.
पत्ता : लक्ष्मी रोड, रविवार पेठ
- सिंग साब :
हे हॉटेल कॉलेजजवळच्या भागात असल्यामुळे विद्यार्थ्यांना आवडेल आणि परवडेल अशीच चव आणि किंमत ठेवण्यात आली आहे. एक डिश साधारण दोन व्यक्तींना पुरेल इतक्या प्रमाणात देण्यात येते. आंबटगोड भाजी आणि मक्याची भाकरी हे जबरदस्त कॉम्बिनेशन इथे मिळते.
पत्ता : एम आय टी कॉलेज, कोथरूड
- खालसा व्हेज :
खडकी भागातील या हॉटेलची माहिती पुण्यातील खवैय्यांना देण्याची गरज नाही. इथली क्रिमी चव असणारी भाजी पुन्हा पुन्हा खावी अशीच आहे.
पत्ता :राजीव गांधी चौपाटी, खडकी बाजार
- पंजाबी ढाबा :
विमाननगर भागात असणाऱ्या या रेस्टोरन्टमध्ये फक्त हेच पदार्थ नव्हे तर इतर पंजाबी पदार्थही झकास मिळतात. विशेषतः खाऊन झाल्यावर इथल्या लस्सीसाठी पोटात जागा नक्की ठेवा. इथली थंडगार लस्सी तुम्हाला थेट पंजाबचा फील देईल.
पत्ता : विमाननगर