कलात्मक अभिव्यक्तीमध्ये प्रामाणिकता असावी : मेहबूब खान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 06:00 AM2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:07+5:30

‘चित्रपट’ हे कलात्मक अभिव्यक्तीचे माध्यम आहे. तुम्ही जे लोकांसमोर आणता ती स्वत:ची अभिव्यक्ती आहे. त्यामध्ये प्रामाणिकता असायलाच हवी'.....

Authenticity should be in artistic expression: Mehboob Khan | कलात्मक अभिव्यक्तीमध्ये प्रामाणिकता असावी : मेहबूब खान

कलात्मक अभिव्यक्तीमध्ये प्रामाणिकता असावी : मेहबूब खान

Next
ठळक मुद्दे१९६१ मध्ये इन्स्टिट्यूटची पहिली बॅच अस्तित्वात

भारतीय चित्रपटनिर्मितीसाठी कलात्मक शिक्षण देणारे एक अभिजात व्यासपीठ अशी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) ची जगभरात ओळख. पुण्यात १९६० मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या जागेत ‘फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’(एफआयआय) या शीर्षकांतर्गत संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि १९६१ मध्ये इन्स्टिट्यूटची पहिली बॅच अस्तित्वात आली. त्या बॅचमधील विद्यार्थी असलेले मेहबूब खान यांच्याशी '' लोकमत '' ने साधलेला संवाद....
०००                        

 

नम्रता फडणीस-  

* तुमची इन्स्टिट्यूट स्थापनेनंतरची पहिली बॅच. त्यावेळचे शैक्षणिक वातावरण कसे होते?
- कोणत्याही कॉलेज किंवा शैक्षणिक इन्स्टिट्यूटसारखे  ‘एफआयआय’चे वातावरण नव्हते. केवळ ३० ते ३५ विद्यार्थी आणि ७ ते ८ शिक्षक असायचे. प्रभात फिल्म स्टुडिओ हीच क्लासरूम असायची.पहिले प्राचार्य गजानन जहागीरदार एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. ते इन्स्टिट्यूट सोडून जाताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. आम्ही एक छान कौटुंबिक वातावरणात वावरलो.

* शिक्षकांची शिकविण्याची पद्धत कशी होती? 
- इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी नवीन काहीतरी शिकतील आणि बाहेर पडल्यानंतर वेगळे काहीतरी करतील, असा शिक्षकांचा दृष्टिकोन असायचा.विद्यार्थ्यांमध्ये नवीन गोष्टी शिकण्याचा उत्साह होता. सतीश माथूर, कमलाकर सूद यांसारख्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. याचे श्रेय हे शिक्षकांनाच जाते. 

* साठीच्या दशकानंतर इन्स्टिट्यूटमध्ये झालेले बदल तुम्ही कसे नोंदविता? 
- पूर्वी प्रभात स्टुडिओमध्येच चित्रपटनिर्मितीचा संपूर्ण प्रवास अनुभवायला मिळत होता. मात्र आता हा स्टुडिओ फिल्म स्कूलमध्ये परावर्तित झाला आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाचे स्वरूप आले आहे. तंत्रज्ञानातही बदल झाले आहेत. पूर्वीसारखे कॅमेरेदेखील आता नाहीत. खूप शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. 

* कलात्मकतेला शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या चौकटीत बसवणं योग्य की अयोग्य? तुमचं मत काय?
- ही सध्याच्या काळाची मागणी आहे, असे म्हणता येईल. पूर्वी चित्रपटनिर्मिती प्रक्रिया वेगळी होती. तेव्हा दूरदर्शनदेखील नव्हते. आजच्या काळात निर्मिती प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित चित्रपटनिर्मिती प्रक्रिया शिकण्यासाठी शिक्षण आवश्यकच आहे. आम्ही निर्मितीसाठी जी साधने वापरत होतो ती आता राहिलेली नाहीत. आता सेटअप, साधने आणि निर्मितीच्या विचारप्रक्रियेमध्येही बदल झाले आहेत. साठीचे दशक आणि एकविसावे शतक यांची तुलना केली तर आमूलाग्र बदल झाले आहेत. 

* एफटीआयआय हल्ली कलात्मकतेसाठी नव्हे, तर  विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी ओळखले जात आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे तुम्ही कसे पाहता?
- विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूटकडून शिक्षणासाठी नवीन साधने उपलब्ध व्हावीत, अशी इच्छा असते. त्याची पूर्तता झाली नाही की वादाला सुरुवात होते. संवाद किंवा चर्चेतून हा  वाद सोडवावा. ही निरंतर चालणारी प्रक्रिया असायला हवी. विद्यार्थ्यांनी गुरूला आणि गुरूने विद्यार्थ्याला कमी लेखता कामा नये. चित्रपटनिर्मिती ही सर्जनशील कला असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना शिक्षकांपेक्षा अधिक गोष्टी अवगत असतात. हे काही टिपिकल शिक्षणशास्त्र नाही. शिक्षक ऐतिहासिक संदर्भ, अनुभव यावर विद्यार्थ्यांना ज्ञान देतात.विद्यार्थी त्याच्या कल्पनाशक्तीच्या अनुषंगाने विचार करीत असतो जे शिक्षकांनी समजून घेतले पाहिजे. ही समजून उमजून चालणारी देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे. कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये राजकारण आणले जाऊ नये. मूलभूत शिक्षणपद्धतीत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात वाद होणं नवीन नाही. एक सर्जनशील आव्हान मानून विद्यार्थ्यांनी पुढे जावे. 

* आजच्या काळातील चित्रपटांबद्दल तुमचं मत काय? तंत्रज्ञान चित्रपटांवर प्रभावी झाले आहे, असे वाटते का?     
- आजचे चित्रपट खूप व्यावसायिक झाले आहेत. चित्रपटांचे बजेट ३०० करोडपर्यंत पोहोचले आहे. पैसे वसूल करण्यासाठी मोठ्या बजेटचे चित्रपटबनवा, अशी एक निर्मात्यांची मानसिकता झाली आहे. इकडचा तिकडचा कंटेंट मिक्सिंग करून चित्रपट बनवले जात आहेत. अशा व्यावसायिक हेतूने बनविलेल्या चित्रपटांना सर्जनशील अभिव्यक्ती म्हणता येणार नाही.  
-----------------------------------------------------                                            
०००                        

Web Title: Authenticity should be in artistic expression: Mehboob Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.