लेखक-प्रकाशक वाद पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:17 AM2018-08-28T02:17:43+5:302018-08-28T02:17:47+5:30
अनिता पाध्ये यांनी प्रकाशन अधिकार काढून घेतले : अनिल कुलकर्णी यांचा इन्कार
पुणे : महाराष्ट्रातील काही प्रकाशकांकडून लेखकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप करीत लेखिका अनिता पाध्ये यांनी अनुबंध प्रकाशनाकडून ‘एकटा जीव’, ‘इष्काचा जहरी प्याला’ आणि ‘एक होता गोल्डी’ या पुस्तकांच्या पुढील आवृत्तीचे प्रकाशन अधिकार काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, प्रकाशक अनिल कुलकर्णी यांनी ‘हक्क काढून घेतले नसून, आपणहून सोडले’ असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे लेखक-प्रकाशक यांच्यातील वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून अनुबंध प्रकाशनाशी लेखिका अनिता पाध्ये संबंधित आहेत. त्यांच्या ‘एकटा जीव’ या लोकप्रिय पुस्तकाच्या दहा आवृत्या प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्याच कमाल अमरोही-मीना कुमारी यांच्या जीवनावर आधारित ‘इष्काचा जहरी प्याला’ व दिग्दर्शक विजय आनंद यांचे जीवनचरित्र ‘एक होता गोल्डी’ या पुस्तकांच्या प्रकाशनाचे अधिकार अनुबंधकडे आहेत. मात्र, हे सर्व अधिकार प्रकाशकांकडून काढून घेत असल्याचे पाध्ये यांनी जाहीर केले आहे. लेखकाला कोणते पुस्तक कुणाकडून करून घ्यायचे, याबाबत अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? प्रकाशक लेखकाला वेठीस धरू शकतो का, असा सवाल अनिता पाध्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. त्या म्हणाल्या, ‘दहा क्लासिक’ पुस्तक करण्यासाठी २०१५ मध्ये अनुबंधशी करार झाला. त्यांनी ३१ हजारांचा चेक मला दिला. त्यांना माझ्याकडची दुर्मिळ छायाचित्र दिली होती. मात्र, मार्च २०१६ उजाडले, तरी पुस्तक झाले नाही. दरम्यान, जो चेक मला दिला तो वटवला नाही. माझी गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. मग, मीच या पुस्तकाचे स्वत: प्रकाशन केले. मला यापुढे तुमच्याबरोबर एकही पुस्तक करायचे नाही, असे सांगून चेक परत दिला आणि जे दुर्मिळ फोटोग्राफ होते ते मागितले. त्याबदल्यात त्यांनी पुस्तकासाठी ज्या प्रिंट आऊट काढल्या त्याची ९ हजार रक्कम द्यावी, असे सांगितले. कॉपी राईट संपुष्टात आणण्यासाठीचा आर्थिक व्यवहार पूर्ण करून पुस्तकांच्या शिल्लक प्रती परत घेतल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘दहा क्लासिक’ या पुस्तकासाठी झाला होता करार
४प्रकाशक अनिल कुलकर्णी यांनी त्यांच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. पाध्ये यांच्या तिन्ही पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या मी प्रकाशित केल्या आहेत. आजपर्यंत कोणतीही वादावादी झाली नाही. चांगले नाते असल्याशिवाय इतक्या आवृत्या प्रकाशित
केल्या असत्या का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘दहा क्लासिक’ या पुस्तकासाठी आमच्यात करार झाला होता. दोन प्रूफरीडिंगसाठी पाठवले, मात्र ते एक महिन्यानी आले. मात्र, त्यांनी ७० टक्के पुस्तक बदलले, ४०० पाने करायची होती पण त्यांनी स्वत:कडे ठेवले. माझे पुस्तक प्रकाशित करू नका, असे सांगून स्वत: पुस्तक प्रकाशित करून कराराचा भंग केला.
४कोणताही प्रकाशक लेखकाला आगाऊ रॉयल्टी देत नाही, तरीही मी प्रत्येक पुस्तकाच्या आवृत्तीसाठी दिली. कॉपीराईट संपुष्टात आल्यावर मी लेखिकेकडे रक्कम मागितली. आणि सोडहक्क पत्र पैसे पूर्ण मिळाल्यानंतरच ग्राह्य धरण्यात यावे असे लिहून दिल्याने, त्यांचा अहंकार दुखावला असल्याने त्यांनी हे पाऊल टाकले असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.