भर पावसात खड्ड्यांमध्ये एरंडाची झाडे लावून अधिकाऱ्यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:58+5:302021-06-21T04:07:58+5:30
शनिवारी दुपारी तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, सचिव अमित प्रभावळकर, सदस्य प्रमोद दाभाडे, सचिन गाडे, बंटी ...
शनिवारी दुपारी तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, सचिव अमित प्रभावळकर, सदस्य प्रमोद दाभाडे, सचिन गाडे, बंटी गाडे, वरुण गायकवाड, अभिजित गाडे, प्रतीक गाडे आदी कार्यकर्त्यांनी चाकण एमआयडीसीतील कला जनसेट कंपनीसमोर पडलेल्या खड्ड्यात उभे राहून रास्ता रोको करून रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यात एरंडाची झाडे लावण्यात आली.
कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे म्हणाले की, तळेगाव-चाकण महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण उडाली असून, पावसाचे पाणी तुंबल्याने या रस्त्याची गटारासारखी अवस्था झाली आहे. कार आणि दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता जीवघेणा बनला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जबाबदारी झटकत या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असे कृती समिती कडून सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षांत अडीचपेक्षा???????? अधिक निष्पाप बळी या रस्त्याने घेतले. वारंवार आंदोलनाचा इशारा देऊनही रस्त्याच्या कामासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. राष्ट्रीय महामार्ग विभागाने सदर रस्त्यावरील खड्ड्यांची आठवडाभरात पक्की दुरुस्ती न केल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही कृती समितीने दिला आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी धो धो पावसात भिजत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या. आंदोलनामुळे एचपी चौक ते महाळुंगेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
चाकण तळेगाव महामार्गावर महाळुंगे परिसरात रस्त्यात वृक्षारोपण करत संबंधित विभागाचा कृती समितीने निषेध नोंदवला.