खोडद रस्त्यावर भुयारी मार्गाला प्राधिकरणाची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:15+5:302021-05-31T04:09:15+5:30
खोडद : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड - सिन्नर (४२ कि.मी. ते १७७ कि.मी.) दरम्यान खोडद ...
खोडद : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड - सिन्नर (४२ कि.मी. ते १७७ कि.मी.) दरम्यान खोडद रस्त्यावर भुयारी मार्ग करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची (एनएचआयए) या भुयारी मार्गाला विस्तारीकरण प्रकल्पाच्या तिसऱ्या फेजमध्ये तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
नारायणगाव-खोडद रस्त्यावर खोडदकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग अथवा पूल बांधण्याची मागणी सन २०१७ पासून खोडद व हिवरे ग्रामस्थ करत आहेत. यासाठी खोडद व हिवरे ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करून हे काम बंद करण्याचा इशारा दिला होता. यावेळी खासदार डॉ. कोल्हे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून मध्यस्थी केली व या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून तिसऱ्या फेजमध्ये खोडद रस्त्यावर भुयारी मार्ग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे- नाशिक महामार्ग विस्तारीकरण व रुंदीकरण प्रकल्पाच्या तिसऱ्या फेज मध्ये खोडद येथील प्रस्तावित भुयारी मार्गाचा समावेश करण्यात आला आहे.
येथे वारंवार होऊ शकणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी व स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सन २०१७ पासून खोडद व हिवरे ग्रामस्थांकडून भुयारी मार्गाची मागणी केली जात होती. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून अखेर खोडद रस्त्यावरील भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लागला आहे. याबद्दल खासदार डॉ. कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, निविदा व प्रकल्प सादरीकरणामध्ये समावेश नसल्यामुळे या भुयारी मार्गासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. यासंदर्भात, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर खोडद रस्त्यावरील भुयारी मार्गाचा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या तिसऱ्या फेजमध्ये समावेश केला असल्याचे एनएचआयने पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे येथील संभाव्य अपघात पूर्णपणे रोखले जाऊन नागरिकांची सुरक्षित वाहतूक होऊ शकेल आणि हा महामार्ग पूर्णत्वास जाऊन वाहतूक दळणवळण यंत्रणा सक्षम होईल.
भुयारी मार्गासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे व एनएचआयएचे अधिकारी यांच्यासोबत सातत्याने बैठका व पत्रव्यवहार सुरू होता. खासदार डॉ. कोल्हे यांनी पहिल्यापासूनच भुयारी मार्ग होणेबाबत सकारात्मक व स्पष्ट भूमिका घेतली होती. हा भुयारी मार्ग करण्याबाबत त्यांनी ग्रामस्थांना शब्द दिला होता. हे सगळे एकत्रित प्रयत्न फलद्रूप होऊन हा भुयारी मार्ग महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामात घेतला गेला आहे. दोन्ही गावांतील ग्रामस्थ यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांचे आभारी आहेत. यापुढेही सदर कामासाठी मंजुरी वेगात मिळून प्रत्यक्ष भुयारी मार्ग योग्य वेळेत होईल, यासाठी ग्रामस्थ आग्रही असतील.
- गुंडीराज थोरात, अध्यक्ष,
ग्रामविकास मंडळ,खोडद, ता.जुन्नर
३० खाेडद
पुणे-नाशिक महामार्गाला छेदून गेलेल्या नारायणगाव-खोडद रस्त्यावर या चौकात भुयारी मार्गाला तिसऱ्या फेजमध्ये मंजुरी मिळाली आहे.