पायरेटेड पुस्तकाविरोधात आता प्रकाशकांबरोबर लेखकही मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:45+5:302021-07-29T04:10:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठीतील शिवाजी सावंत, रणजित देसाई, पु. ल. देशपांडे अशा लेखकांची मागणी असणारी पुस्तके ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठीतील शिवाजी सावंत, रणजित देसाई, पु. ल. देशपांडे अशा लेखकांची मागणी असणारी पुस्तके पायरेटिंग होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाचकदेखील स्वस्तात पुस्तके मिळत असल्याने या पायरेटेड पुस्तकांची खरेदी करताना दिसत आहेत. यामध्ये वाचक, प्रकाशक, लेखक आणि सरकारचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे पायरेटेड पुस्तकांविरुद्धच्या लढ्यामध्ये प्रकाशकांबरोबरच आता लेखकदेखील उतरले आहेत. पुस्तकांचे पायरेयटिंग करण्यामध्ये परप्रांतीय गुंडांचा धंदा वाढला असून, प्रत्यक्ष विक्रीसाठी मराठी मुलांना समोर उभे केले जात आहे असे सांगत, हे गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधिताविरुद्ध कडक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा लेखक विश्वास पाटील यांनी दिला आहे.
वाचकांना कर्णाचे जीवन समजून घेण्यासाठी ‘मृत्युंजय’ किंवा ‘राधेय’ हवी असेल, संभाजीराजांचे जीवन समजून घेण्यासाठी ‘संभाजी’ किंवा ’छावा’ कादंबरी हवी असेल. तर अशा महापुरुषांचे जीवन समजून घेताना डुप्लिकेट पुस्तके बाळगणे योग्य आहे का? संबंधित वाचकांचे आपल्या लाडक्या श्रेष्ठ मराठी लेखकावर खरेच प्रेम आहे का? आज शिवाजी सावंत आणि रणजित देसाई यांच्या कुटुंबियांचे चरित्राचे साधन त्त्यांच्या ग्रंथांपासून मिळणारी रॉयल्टी हेच आहे. तरी मराठी वाचकराजाने अशा गैरप्रकारांना थारा द्यावा काय? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, लेखकांना रॉयल्टीवर कर भरावा लागतो. प्रकाशकांनाही कर द्यावा लागत असल्याने पुस्तकांच्या किंमती वाढल्या आहेत. पायरेटेड पुस्तके विकणा-यांना कोणताही कर भरावा लागत नाही. ही पुस्तके स्टायलिश वाटत असली तरी त्या पुस्तकांची छपाई बेकार असते. काही महिन्यांनी पुस्तके काळी पडतात. वाचक ही पुस्तके घेऊन आमच्याकडे येतात . तेव्हा पुस्तके पायरेटेड घेतली असल्याचे त्यांना सांगतो. हे साधारणपणे उत्तरप्रदेश आणि कलकत्याचे गुंड व्यापारी आहेत. त्यांच्याविरूद्ध आम्ही केसेस दाखल केल्या आहेत.
पुस्तक चोरांपासून दूर रहा
कॉपीराइट कायद्याप्रमाणे नकली पुस्तके विकणे गुन्हा आहे. स्वत:जवळ किंवा पब्लिक लायब्ररीमध्ये अशी पुस्तके आढळून आल्यास संबंधितांना गुन्ह्यामध्ये अटक होऊ शकते. ज्या पुस्तकांच्या दुकानात पायरेटेड पुस्तके आढळून येतील. त्यांना गुन्ह्यांमधील सहयोगी म्हणून कारवाईला तोंड द्यावे लागेलच. शिवाय आपल्या दुकानाच्या जागेचा उपयोग बेकायदेशीर कामासाठी केल्याबद्दल संबंधितांचे शॉप अँक्ट खालील दुकानाचे लायसन सुद्धा रद्द होऊ शकते, याची संबंधितांनी गंभीर नोंद घ्यावी. जागृत वाचकांनीही अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनकडे तक्रार करावी. तसेच शासनाचा या पुस्तक चोरांकडून बुडवला जाणारा महसूल वाचवावा असे आवाहनही पाटील यांनी वाचकांना केले आहे.
---------------------------------------------------------------