कुतूहल जागृत ठेवण्याची जबाबदारी लेखकांची
By admin | Published: June 1, 2016 12:57 AM2016-06-01T00:57:17+5:302016-06-01T00:57:17+5:30
‘गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी शिक्षणाचा बोलबाला झाला असला तरी मराठी मनात मराठी वाचनाची आवड कमी झालेली नाही. विज्ञानातील संकल्पना मराठी भाषेतच अधिक चांगल्या पद्धतीने समजतात
पुणे : ‘गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी शिक्षणाचा बोलबाला झाला असला तरी मराठी मनात मराठी वाचनाची आवड कमी झालेली नाही. विज्ञानातील संकल्पना मराठी भाषेतच अधिक चांगल्या पद्धतीने समजतात. त्यामुळे विज्ञान लेखकांवर विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. कुतूहल जागृत ठेवल्याने विद्यार्थ्यांना ज्ञान मिळविण्याची गोडी लागेल,’ असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.
स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे डॉ. के. सी. मोहिते लिखित ‘सेरेन्डीपीटी’ अर्थात अनपेक्षित लागलेले शोध आणि वैशाली मोहिते लिखित ‘ती’च्या कविता या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मंगळवारी झाला. त्याप्रसंगी डॉ. पंडित विद्यासागर बोलत होते. कार्यक्रमास चिंतन ग्रुपचे अध्यक्ष अभिनंदन थोरात, साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या विश्वस्त व संशोधन विभागप्रमुख डॉ. मंदा खांडगे, स्नेहवर्धन प्रकाशन संस्थेच्या डॉ. स्नेहल तावरे आदी उपस्थित होते.
पंडित विद्यासागर म्हणाले, ‘‘इंग्रजी शाळांची संख्या वाढली असली तरी मराठी भाषेत प्रसिद्ध झालेले विज्ञानविषयक लेखन वाचणाऱ्यांमध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थी विज्ञानातील संकल्पना मातृभाषेतून समजावून घेणे पसंत करतात. त्यामुळे विज्ञानलेखकांवर या विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे. लेखकांनी अनेक छोट्या-छोट्या गोष्टींवर लिहिले पाहिजेत. विज्ञानामध्ये ज्ञान, मनोरंजन आणि अचूकता असते. त्यात कल्पनारंजन आणता येत नाही. विद्यार्थ्यांमधील कुतूहल जागृत ठेवणे अवघड आहे. मात्र, सतत काहीतरी लिहून ते जागे ठेवायला हवे.’’
खांडगे यांनी के. सी. मोहिते व वैशाली मोहिते यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अभिनंदन थोरात यांनी अध्यक्षीय भाषणात पुस्तकाविषयी माहिती देऊन वैशाली मोहिते व डॉ. के. सी. मोहिते यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली. तर डॉ. के. सी. मोहिते यांनी ‘लोकमत’च्या युरेका पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांवर आधारित सेरेन्डीपीटी या पुस्तकाविषयी माहिती दिली. वैशाली मोहिते यांनी याप्रसंगी आपल्या काही कवितांचे वाचन केले. तसेच काव्यलेखनाची पार्श्वभूमी सांगितली.