रिक्षा घरातच, एजंटच्या आशीर्वादाने ‘रोड टेस्ट’ शिवाय पास होताहेत रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 11:49 AM2021-12-14T11:49:38+5:302021-12-14T11:53:50+5:30

प्रसाद कानडे पुणे : ‘रोड टेस्ट’ न घेताच अथवा ‘रोड टेस्ट’मध्ये नापास झालेल्या रिक्षा एजंटमार्फत आल्यानंतर त्यांना तीनशे रुपयांच्या ...

auto rickshaws rto passing without the road test agent crime in pune | रिक्षा घरातच, एजंटच्या आशीर्वादाने ‘रोड टेस्ट’ शिवाय पास होताहेत रिक्षा

रिक्षा घरातच, एजंटच्या आशीर्वादाने ‘रोड टेस्ट’ शिवाय पास होताहेत रिक्षा

Next

प्रसाद कानडे

पुणे : ‘रोड टेस्ट’ न घेताच अथवा ‘रोड टेस्ट’मध्ये नापास झालेल्या रिक्षा एजंटमार्फत आल्यानंतर त्यांना तीनशे रुपयांच्या बदल्यात पास केले जात आहे. नापास होण्यापेक्षा एजंटांना तीनशे रुपये देणे हे कमी त्रासाचे अथवा वेळ वाचविणारे असल्याने रिक्षाचालक एजंटांना तीनशे रुपये देऊन ‘रोड टेस्ट’मध्ये पास होत आहेत. फुले नगर आरटीओ असो की दिवेघाट आरटीओ असो सर्वच ठिकाणी हा प्रकार सर्रास घडत आहे. एजंटचा आशीर्वाद असल्याने घरासमोर थांबलेली रिक्षाही ‘रोड टेस्ट’मध्ये पास होत आहे.

रिक्षा भाडे वाढल्यानंतर नव्या दराप्रमाणे रिक्षा मीटरचे कॅलिब्रेशन करण्याचे काम सुरु आहे. आत्तापर्यंत पुण्यातल्या जवळपास वीस हजार रिक्षांचे मीटर अपडेट करण्यात आले. रिक्षातील मीटर कॅलिब्रेशन करताना दोन प्रकारे मीटरची चाचणी केली जाते. यात पहिल्यांदा ज्या कंपनीचे मीटर रिक्षात बसविले आहे त्याची चाचणी घेऊन मग त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. यानंतर आरटीओच्या ‘टेस्ट ट्रॅक’वर मोटार वाहन निरीक्षकांच्या उपस्थितीत रोड टेस्ट घेतली जाते. या चाचणीत नापास होणारे अथवा ज्यांना अशाप्रकारची टेस्टच द्यायची नाही, अशी मंडळी परिसरातील एजंट गाठतात. त्यानंतर ‘लक्ष्मीदर्शन’ केल्यावर एजंटकडून आलेल्या फॉर्मवर उपस्थित मोटार वाहन निरीक्षक कोणतीही चाचणी न घेताच सही करतो. याचाच अर्थ रिक्षा ‘रोड टेस्ट’मध्ये पास होते.

टेस्टमध्ये काय पाहतात :

पुण्यात पाच ठिकणी रोड टेस्टचे काम होते. रोज सुमारे ४०० ते ५०० रिक्षांची चाचणी घेतली जाते. आपला क्रमांक लवकर यावा, यासाठी रिक्षाचालक पहाटे पाच-सहा वाजताच चाचणी केंद्रावर जमतात. ट्रॅकवर थांबलेले निरीक्षक मीटर दीड किलोमीटर धावल्यानंतर २२ रुपये व १.६ किलोमीटर प्रवास केल्यावर २४ रुपयांचा आकडा मीटरवर येतो का, हे पाहतात. यात फरक पडला तर संबंधित रिक्षा चाचणीत नापास झाल्याचा शेरा मिळतो. मग रिक्षा चालकाला दुसऱ्या दिवशी पुन्हा चाचणीसाठी यावे लागते. हे टाळण्यासाठी तीनशे रुपयांची ‘दक्षिणा’ देऊन रिक्षाचालक चाचणीत पास होतात.

‘३ नारळ’ असा आहे कोड

“एजंट यासाठी ‘तीन नारळ’ असा कोड वापरतात. याचा अर्थ तीनशे रुपये. रिक्षा चालकाने पैसे दिल्यावर अधिकारी रोड चाचणी न घेताच रिक्षा पास करतात. पैसे मिळावे यासाठीसुद्धा चाचणीत ‘फेल’ केले जाते. मीटर कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रॉनिक मीटर, टायरमधली हवा, टायरची झीज आदी कारणांमुळे मीटरच्या अचूकतेमध्ये १९-२० टक्के फरक पडतोच. आरटीओ प्रशासनाने याचा विचार केला पाहिजे.”

- आनंद अंकुश, सचिव, आम आदमी रिक्षाचालक संघटना

“रिक्षाच्या मीटरचे कॅलिब्रेशन केल्यानंतर नियमाप्रमाणे चाचणीसाठी गेलो असता, एक रुपया कमी-जास्त आल्याने आत्तापर्यंत तीनवेळा मला चाचणीत फेल करण्यात आले. यानंतर एका दलालाने माझ्याकडून तीनशे रुपये घेऊन चाचणीत पास करून दिले. मी याची लेखी तक्रार दिली आहे.”

- बळीराम कांबळे, तक्रारदार रिक्षाचालक

या संदर्भात आरटीओची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी अधिकृत स्पष्टीकरण देणे टाळले.

Web Title: auto rickshaws rto passing without the road test agent crime in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.