भीमा खोऱ्यांतील धरणांवर स्वयंचलित रेनगेट स्टेशन उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:23+5:302021-06-03T04:09:23+5:30
अतिवृष्टी, धरणाच्या पाणीपातळीची संगणकावर मिळणार अचूक माहिती भाग - २ पुणे : भीमा खोऱ्यातील नद्यांवर पूरपरिस्थिती उद्भवू नये. यासाठी ...
अतिवृष्टी, धरणाच्या पाणीपातळीची संगणकावर मिळणार अचूक माहिती
भाग - २
पुणे : भीमा खोऱ्यातील नद्यांवर पूरपरिस्थिती उद्भवू नये. यासाठी खोऱ्यातील सर्वच धरणांवर स्वयंचलित रेनगेट स्टेशन (ऑटोमॅटिक रेनगेट स्टेशन) उभारण्यात येणार आहे. धरणाच्या कॅचमेन्ट भागात पडणारा पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी आणि धरणाची पाणीपातळी याची अचूक माहिती जलसंपदा विभागाच्या कार्यालयात संगणकावर मिळणार आहे. त्यामुळे आता धरणावर जाऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याची गरज भासणार नाही. येत्या वर्षभरात सर्वच धरणांवर हे स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कृष्णा खोऱ्यातील पूरपरिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा १० दिवस पाण्याखाली होता. या जिल्ह्यातील शेतीबरोबरच घरे, जनावरे, इतर स्थावर मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले होते. हे नैसर्गिक नुकसान टाळण्यासाठी वडणेरे समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार कृष्णा खोऱ्यातील ४० धरणांवर तातडीने स्वयंचलित रेनगेट स्टेशन उभारण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर भीमा खोऱ्यातील धरणांवर ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
---
ढगफुटीचीही कारणे शोधणार
मागील काही वर्षांत राज्यातील अनेक भागात ढगफुटीच्या घटना घडत आहेत. पुणे शहरातही ढगफुटी झाल्यामुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. तसेच काही नागरिकांचा जीव गेला. त्याचबरोबर इतरही मोठे नुकसान झाले होते. असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. त्यामुळे विशिष्ट भागात होणाऱ्या ढगफुटीचा देखील अभ्यास ही समिती करणार आहे. तसेच त्यावर तातडीने काय उपाय योजायचे हे देखील पाहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
सॅटेलाईट इमेजचा वापर करून पूर अंदाज बांधणार
मोठ्या शहरात अतिवृष्टी कुठे होणार, याचा अचूक अंदाज यावा यासाठी मुंबईतील सांताक्रूझ, दादर आणि नरिमन पॉइंट येथे डॉप्लर रडार यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याच्या अगोदर याची अचूक माहिती मिळत आहे. तसेच भीमा खोऱ्यातील धरण क्षेत्रात आणि नदीच्या प्रवाहाच्या मार्गावर भारतीय हवामान विभागाच्या साहाय्याने सॅटेलाईट इमेजचा वापर करून ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पूर अंदाज माहिती उपलब्ध होणार आहे. त्यातून आधीच उपाययोजना करता येणार आहेत.
---
५० वर्षांतील पर्जन्यमान तपासणार
गेल्या ४०-५० वर्षांत महाराष्ट्रातील पर्जन्यमान कसे होते, त्यात कसा बदल होत गेला, कसे कमी झाला. कारण १९९६, २००५ आणि २००६ या काळात अतिवृष्टीमुळे उजनी धरण पूर्ण भरल्याने खालच्या भागात पूरसदृश परिस्थिती ओढवली होती. त्यामुळे प्रामुख्याने भीमा खोऱ्यातील पर्जन्यमानाचा अभ्यास करण्यात येणार आहे सध्या जलसंपदा विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. पुण्यातील सिंचन भवन येथून याबाबतच्या सर्व कामाच्या बाबतीत आणि दळणवळणाच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.