विहिरीच्या पाण्यात क्लोरिन टाकण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा; २४ तास कार्यरत राहणार
By राजू हिंगे | Updated: January 28, 2025 15:31 IST2025-01-28T15:30:35+5:302025-01-28T15:31:25+5:30
सिंहगड रोड भागातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी प्रदूषित असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे

विहिरीच्या पाण्यात क्लोरिन टाकण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा; २४ तास कार्यरत राहणार
पुणे: शहरात सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदेड सिटी, धायरी, आंबेगाव परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रूग्ण मोठया प्रमाणात आढळत आहेत. या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी प्रदूषित असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे विहिरीच्या पाण्यात क्लोरिन टाकणे आणि क्लोरिनचे प्रमाण मोजण्यासाठी आता स्वयंचलित मीटर यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
पाण्याच्या शुद्धीकरणाची प्रत्येक तासाची माहितीही प्रशासनास एका क्लीकवर मिळणार आहे. ही यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार असून, या विहिरीसाठी दोन स्वतंत्र मीटर बसविण्याचे विचारधीन आहे. आता पर्यंंत या निर्जंतूकीकरणाचे काम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जात होते. पाण्याच्या कोणत्याही तपासण्या केल्या जात नव्हत्या. मात्र, या आजाराचे वाढते रूग्ण लक्षात घेता तातडीने ही उपाय योजना करण्यात येणार आहे. या विहिरीत गावांसाठीचे पाणी थेट खडकवासला धरणातून सोडले जाते. त्यानंतर विहीरीतच निर्जंतूकीकरण केले जाते. मात्र, निर्जतूंकीकरणाचे औषध किती पाण्यात किती हे निश्चित असले, तरी कर्मचाऱ्यांना त्याचा नेमका अंदाज येत नाही. तसेच ते कमी जास्त होते. त्यामुळे या कामासाठी दोन नवीन टाक्या आणि स्वयंचलित यंत्रणा बसविली जाणार आहे.
गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत क्लोरिन टाकण्यासाठी स्वंयचलीत मीटर यंत्रणा बसविण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे.- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग , पुणे महापालिका