महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 09:55 PM2022-02-14T21:55:01+5:302022-02-14T21:56:25+5:30
राजीव सहस्त्रबुद्धे: दहा वर्षांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कर्वे रस्त्यावरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. म.ए.सो. अंतर्गत स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेले हे दुसरे महाविद्यालय आहे, अशी माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आणि प्राचार्य प्रा. डॉ. पी. बी. बुचडे यावेळी उपस्थित होते.
शिक्षणाचे माहेर घर म्हणून पुण्याची ओळख ही अनेक शैक्षणिक संस्थांमुळे आहे. यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान आहे. १८६० मध्ये आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी स्थापन केलेली पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाऊ लागली. सन १८९६ मध्ये संस्थेने महाराष्ट्र कॉलेज सुरू केले होते. या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी विद्रोही भाषणे केल्याने हे महाविद्यालय इंग्रज सरकारच्या रोषाला पात्र ठरले आणि त्यानंतर बंद पडले. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पदार्पण करताना एम.ई.एस. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स १९४५ साली सुरू केले, जणू हा महाराष्ट्र कॉलेजचा पुनर्जन्मच! हेच कॉलेज आबासाहेब गरवारे महाविद्यालय म्हणून आज ओळखले जाते. गेली १६१ वर्ष ‘मएसो’चे कार्य याची साक्ष देते, यामध्ये आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने गेली ७५ वर्षे योगदान दिले आहे. मागील वर्षी हे महाविद्यालयाचे हीरक महोत्सवी वर्ष होते.
१९४५ साली स्थापन झालेल्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये आता २५ पदवीधर शिक्षण विभाग आहेत ज्यामध्ये १८ पदव्युत्तर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त विज्ञान आणि कला विद्याशाखेतील ७ संशोधन केंद्रे आहेत. महाविद्यालयात ५० पेक्षा जास्त अभ्यासक्रम शिकवले जातात.
महाविद्यालयाला तीन वेळा नॅकद्वारे प्रमाणित केले आहे. चालू वर्षात वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात अद्ययावत वर्ग आणि प्रयोगशाळा आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. महाविद्यालयात अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रमही राबवले जातात.
ऑगस्ट २०२० मध्ये महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा मिळवण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर केला होता. कोविडच्या परिस्थितीमुळे सप्टेंबर २०२१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला भेट दिली. प्रत्यक्ष पाहणीनंतर, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा देण्याची शिफारस केली.