रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! बर्थ रिकामे झाल्यास तुम्हाला येईल मोबाईलवर मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 01:35 PM2021-12-07T13:35:40+5:302021-12-07T13:39:06+5:30
प्रसाद कानडे पुणे : रेल्वे प्रवाशांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला कन्फर्म तिकिटासाठी वेगवेगळ्या गाड्यांच्या याद्या धुंडाळत बसण्याची ...
प्रसाद कानडे
पुणे : रेल्वे प्रवाशांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला कन्फर्म तिकिटासाठी वेगवेगळ्या गाड्यांच्या याद्या धुंडाळत बसण्याची गरज नाही. तुम्ही जात असलेल्या मार्गावर जर कोणत्या गाडीत सीट उपलब्ध असेल, तर त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल. त्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीटच मिळेल. आयआरसीटीसीने पुशअप् नावाची नवी सुविधा सुरू केली असून, त्याअंतर्गत प्रवाशांना चार्ट तयार होण्याआधीच सीट उपलब्ध असल्याचा मेसेज मोबाईलवर पाठविला जात आहे.
आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ने ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी प्रवाशांनी पुश अप् नोटिफिकेशनसाठी आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या मोबाईलवरच सीट उपलब्ध असल्याचा मेसेज पाठविला जाईल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
हे कसे काम करेल :
आपण ज्या मार्गावरच्या गाड्यांचे तिकीट काढणार आहात. उदा. पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे तिकीट काढत असाल, तर तुम्हाला यादरम्यान धावणाऱ्या सर्वच गाड्यांचे तिकीट फुल्ल झाले असेल, तर त्यावेळी आपण पुश अप्चा पर्याय निवडू शकता. तसेच तुम्ही सर्च केलेल्या हिस्ट्रीचा आधार घेत त्यावरून त्या मार्गावर धावणाऱ्या कोणत्याही गाडीत सीट उपलब्ध झाली की, तुम्हाला लगेच मेसेज येईल. तेव्हा त्यानंतर प्रवाशांना तिकीट काढता येईल.
वेटिंगपासून सुटका :
अनेक प्रवासी लांब पल्ल्याच्या गाड्यात कन्फर्म तिकीट मिळावे, म्हणून चार महिने आधीच तिकीट काढण्याची घाई करतात, तर काही जण वेटिंग काढून कन्फर्म होण्याची वाट पाहतात. यात काहींचे कन्फर्म होतात, तर काहींचे नाही. आता या नव्या सुविधेमुळे मात्र प्रवाशांना कन्फर्म तिकीटच मिळेल. त्यामुळे प्रवाशांची वेटिंग तिकिटापासून सुटका होईल.
प्रवाशांना उपलब्ध सीटची माहिती देणारी पुश अप् ही नवी सुविधा सुरू केली. यामुळे अनेक प्रवाशांना याचा फायदा होत आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.
- पिनाकीन मोरावला, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी, मुंबई