आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी लवकरच लोहगाव विमानतळावर होणार सुविधा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:42 PM2018-01-16T13:42:14+5:302018-01-16T13:44:35+5:30
लवकरच जगभरात मालाची निर्यात करण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी ही माहिती दिली.
पुणे : लोहगाव विमानतळावर सध्या दररोज १५ ते २० टन मालवाहतूक क्षमता असलेली आंतरराष्ट्रीय कार्गो सुविधा आहे. मात्र, सध्या केवळ जर्मनी, अबुधाबी आणि दोन दुबई अशा चारच ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानांची सुविधा आहे. त्यातही केवळ दुबईलाच निर्यात होते. लवकरच जगभरात मालाची निर्यात करण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी ही माहिती दिली. या वेळी खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. पुण्यातून निर्यात वाढविण्यासाठी विमान कंपन्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यातून प्रवासी विमानाने देशातील अन्य आंतरराष्ट्रीय विमानतळांवर माल पोहोचविला जाईल. त्या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय विमानाने जगभर माल पाठविण्याचे नियोजन आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर युरोप, अमेरिकेसह जगभरात मालवाहतूक करता येणार आहे.
विमानतळासाठी सध्या जागेची कमतरता भासत असून विस्तारासाठी अतिरिक्त १५ एकर जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणासाठी १,००० मीटर धावपट्टीची आवश्यकता आहे. त्यासाठीही जागा आवश्यक आहे. धावपट्टी विस्तारीकरणानंतर आंतरराष्ट्रीय विमान सुविधा तसेच आयात निर्यात सुविधा वाढविणेही शक्य होणार असल्याचे अजय कुमार यांनी स्पष्ट केले.
नवीन टर्मिनलला मंजुरी
विमानतळावर ४२ हजार चौरस मीटर क्षेत्रपळ असणाऱ्या नवीन टर्मिनलच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. हे काम मे २०१८पासून प्रत्यक्ष सुरू होईल. त्यासाठी ५०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्याचबरोबर, आॅक्टोबरपर्यंत नवीन ५ पार्किंग बे तयार करण्याचे काम पूर्ण होईल. सध्या पार्किंगसाठी जागा कमी असल्याने काही वेळा विमान उड्डाणात किंवा उतरण्यात अडथळे येतात. विस्तारीकरणानंतर विमानतळावर १० विमाने एकाच वेळी हाताळता येतील. विमानतळाबाहेर वाहनांसाठी बहुमजली पार्किंग सुविधा केली जाणार आहे. त्यामुळे किमान एक हजार कारचे पार्किंग करता येईल, असे अजय कुमार यांनी नमूद केले.