महापालिकेकडील उपलब्ध लस संपल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:11 AM2021-04-17T04:11:26+5:302021-04-17T04:11:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासनाकडे मागणी करूनही महापालिकेला शुक्रवारी दिवसभरात लसपुरवठा होऊ शकला नाही़ त्यामुळे पुणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाकडे मागणी करूनही महापालिकेला शुक्रवारी दिवसभरात लसपुरवठा होऊ शकला नाही़ त्यामुळे पुणे महापालिकेकडील उपलब्ध असलेल्या कोव्हिशिल्ड या सर्व लस वितरित करण्यात आल्या असून, आता महापालिकेकडे या लसीचा एकही डोस शिल्लक नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे़
दरम्यान, ज्या केंद्रांना लस दिल्या आहेत, त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या साठ्यामधूनच शनिवारी लसीकरण होऊ शकते़ यामध्ये कोव्हिशिल्ड लसीचाच समावेश आहे़ तर नव्याने कोणत्याही नागरिकास को-व्हॅक्सिन ही लस देण्यात येणार नसून, महापालिकेकडे ज्या नागरिकांना पहिला डोस दिला आहे अशांकरिताच को-व्हॅक्सिन लससाठा ठेवण्यात आला आहे़ यानुसार महापालिकेकडे किंबहुना वितरीत करण्यात आलेल्या ३५ हजार को-व्हॅक्सिनचे डोस उपलब्ध आहेत़
तर दैनंदिन पुरवठ्यात शहरातील १६० केंद्रांवर महापालिकेकडून आज नारायण पेठ येथील शीतगृहात उपलब्ध असलेल्या १३ हजार ८० कोव्हिशिल्डचे डोस वितरित करण्यात आले आहेत़ त्यामुळे सद्यस्थितीला महापालिकेकडे एकही डोस शिल्लक नसून, आता राज्य शासनाकडून पुरवठा होईल तेव्हाच शहरातील १६० लसीकरण केंद्रांवर पुढील लस दिली जाईल, असेही आरोग्य विभागाने सांगितले आहे़
-------------------
चौकट
शहरातील १६० लसीकरण केंद्रांवर आज दिवसभरात किती लसीकरण झाले याची आकडेवारी आरोग्य विभागाकडे रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झालेली नव्हती़ मात्र पुणे जिल्हा लसीकरण यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात म्हणजेच पुणे महापालिका हद्दीत कोव्हिशिल्डचे १५ हजार ८७१, तर को-व्हॅक्सिनचा ३ हजार ३०१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे़
----------------------------------