पेट्रोल संपल्यानंतर चाेरीची दुचाकी सोडून देणारा अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:57+5:302021-01-03T04:13:57+5:30
पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरून पेट्रोल संपल्यानंतर रस्त्यात दुचाकी सोडून पसार होणार्या चोरट्याला चतु:श्रृंगी पोलिसांनी पकडले. चोरट्याकडून १० दुचाकी ...
पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरून पेट्रोल संपल्यानंतर रस्त्यात दुचाकी सोडून पसार होणार्या चोरट्याला चतु:श्रृंगी पोलिसांनी पकडले. चोरट्याकडून १० दुचाकी जप्त केल्या आहेत.
अमीनुर वहाब मंडल (वय २७, सध्या रा. कपील मल्हार सोसायटी, बाणेर, मूळ रा. कासीपूर, पश्चिम बंगाल ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मंडल बाणेरमधील धनकुडे वस्ती परिसरात थांबला होता. गस्त घालणारे पोलीस नाईक प्रकाश आव्हाड, सारस साळवी यांनी त्याला पाहिले. पोलिसांनी संशयावरुन त्याच्याकडे चौकशी सुरू केली. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. तपासात त्याने मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरल्यानंतर पेट्रोल संपल्यानंतर तो रस्त्यात दुचाकी सोडून पसार व्हायचा, अशी माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली.
मंडल याच्याकडून १० दुचाकी जप्त केल्या आहेत. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेवाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दादा गायकवाड, मोहनदास जाधव, महेश भोसले, हवालदार दिनेश गंडाकुश, मुकुंद तारू, श्रीकांत वाघवले यांनी ही कारवाई केली.