Gudhi Padwa: माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनउटीतून साकारला रांजणगावच्या महागणपतीचा अवतार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 07:18 PM2023-03-22T19:18:52+5:302023-03-22T19:19:03+5:30
अलंकापुरीत पाडव्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी घेतले माऊलींच्या समाधीचे दर्शन
आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हजारो भाविकांनी माऊली... माऊली... माऊलींच्या.. नामघोषात संजीवन समाधीचे दर्शन घेतले. गुढीपाडव्या निमित्ताने माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनउटीतून रांजणगावच्या महागणपतीचा अवतार साकारण्यात आला. अभिजित धोंडफळे व देवस्थानच्या सहकार्यातून चंदन उटी साकारली. माऊलींचे श्री गणेश अवतारातील हे मनमोहक रूप पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
तत्पूर्वी, माऊलींच्या मंदिरात पहाटे साडेतीन वाजता घंटानाद झाला. साडेपाचच्या सुमारास पवमान पूजा व दुधारती संपन्न झाली. प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते महापूजा घेण्यात घेऊन माऊलींना साखरगाठी अर्पण करण्यात आली. तद्नंतर ''पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय'' असा नामघोष करून भाविकांना 'श्रीं'च्या दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला. दिवसभरात सुमारे पंचेचाळीस हजारांहून अधिक भाविकांनी नतमस्तक होत समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान वीस हजारांहून अधिक भाविकांनी देवस्थानच्या वतीने ठेवण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.