स्थायी समिती सभापतिपदी आसवानी
By admin | Published: March 6, 2016 01:06 AM2016-03-06T01:06:15+5:302016-03-06T01:06:15+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी राष्ट्रवादी काँगे्रसचे हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी राष्ट्रवादी काँगे्रसचे हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. आसवानी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात होती. दरम्यान, शनिवारी निवडणुकीची औपचारिकता पार पडली.
साखर आयुक्त बिपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतिपदासाठी निवडणूक झाली. दरम्यान, आसवानी यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी महापौर आझम पानसरे, पक्षनेत्या मंगला कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांनी आसवानींचे अभिनंदन केले.
सभापतिपदासाठी १ मार्चला उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत होती. या मुदतीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसकडून आसवानी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.
स्थायी समितीत सोळापैकी बारा सदस्य राष्ट्रवादीचे असल्याने आसवानी यांची निवड निश्चित
मानली जात होती. दरम्यान,
शनिवारी निवडणुकीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आसवानी यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
सन २००९मध्ये महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या आसवानी यांनी २००९मध्ये उपमहापौरपद भूषविले आहे.
त्यानंतर २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते प्रभाग क्रमांक ४४मधून निवडून आले. (प्रतिनिधी)