नऊ महिन्यांपासून सरासरी वीजबिलाचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:11 AM2021-01-25T04:11:41+5:302021-01-25T04:11:41+5:30
पिरंगुट गावातील प्रा. योगेश हांडगे यांना गेल्या ९ महिन्यांपासून सरासरी ३५ युनिट वीजबिल येत आहे. खरं म्हणजे महावितरणकडून मीटर ...
पिरंगुट गावातील प्रा. योगेश हांडगे यांना गेल्या ९ महिन्यांपासून सरासरी ३५ युनिट वीजबिल येत आहे. खरं म्हणजे महावितरणकडून मीटर रीडिंगसाठी माणूस येऊन जातो, पण तरी देखील बिलामध्ये काहीही फरक झालेला नाही. त्यामुळे ग्राहक मात्र वैतागले आहेत. लॅाकडाऊनमध्ये सर्व काही बंद असल्याने महावितरणकडून सरासरी बिल देण्यास सुरुवात केली. तसेच हांडगे यांच्या बिलावर गेली ९ महिने झाले चालू रिडिंग १८५७ युनिट दाखवत आहे. नऊ महिन्यांपुर्वी एवढेच रीडिंग होते आणि आताच्या बिलावरही तेवढेच दाखवले आहे. प्रत्यक्षात मीटर रीडिंगमध्ये सध्या १९१० युनिट दाखवत आहे. याचाच अर्थ गेली नऊ महिने विनाकारण महिन्याला ३५ युनिटचे बिल हांडगे यांना येत आहे. हांडगे यांचा ३५ युनिट वापर होत नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत महावितरणकडे तक्रार केली. पण त्यांना काहीच उत्तर आलेले नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-----------------------
मी गेली अनेक दिवस झाले महावितरण अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. ऑनलाइन देखील माहिती दिली. पण कोणीच माझी अडचण सोडवलेली नाही. मीटर रीडिंगसाठी माणूस येत असूनही बिलात चुकीचे युनिट दाखवत आहेत. याचाच अर्थ महावितरणची व्यवस्था योग्य काम करत नाही.
- प्रा. योगेश हांडगे, पिरंगुट
----------------------
महावितरणकडून अनेक ठिकाणी रीडिंगला अजूनही माणूस येत नाही. मागील बिले पाहून सरासरी बिल देण्याचा फंडा महावितरणकडून अवलंबिला जात आहे. लॅकडाऊनमध्येही पध्दत योग्य होती, पण आता सर्व सुरळीत झाले असतानाही सरासरी बिले दिली जात आहेत, अशी नागरिकांची तक्रार आहे.
-------------------------