महाराष्ट्रातील १६५ तालुक्यांत पावसाने ओलांडली सरासरी, १७ तालुके तहानलेलेच; ३४ लाख हेक्टरवर पेरण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 10:39 AM2024-06-22T10:39:59+5:302024-06-22T10:43:03+5:30
पूर्व विदर्भातील चार जिल्हे नंदूरबार व पालघर जिल्ह्यांमधील १७ तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भातील भात लागवडीवर परिणाम झाला आहे...
पुणे : राज्यात १ जूनपासून आजवर एकूण १४१ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असून २५ जिल्ह्यांमधील १६५ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. त्यात प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ३३ लाख ८३ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. ही पेरणी सरासरीच्या सुमारे २४ टक्के इतकी आहे. मात्र, पूर्व विदर्भातील चार जिल्हे नंदूरबार व पालघर जिल्ह्यांमधील १७ तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे कोकण व पूर्व विदर्भातील भात लागवडीवर परिणाम झाला आहे.
मान्सून वेळेवर दाखल होऊनही त्या तुलनेत त्याची प्रगती झाली नव्हती. परिणामी, राज्यातील १४६ तालुक्यांत ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यात १७ तालुक्यांमध्ये तर २५ टक्क्यांपेक्षाही कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तसेच नंदूरबार व पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळेच नागपूर विभागात आतापर्यंत केवळ ५२ हजार हेक्टरवरच (२.७१ टक्के) पेरण्या झाल्या आहेत, तर कोकणातही पेरण्यांवर परिणाम झाला असून या विभागातही केवळ १३ हजार हेक्टरवरच (३.०९ टक्के) पेरण्या होऊ शकल्या आहेत. मान्सूनने गुरुवारी पूर्व विदर्भात वाटचाल सुरू केल्याने या भागात येत्या आठवडाभरात पेरण्यांमध्ये वाढ होईल, अशी माहिती विस्तार व प्रशिक्षण संचालक विनय आवटे यांनी सांगितले. राज्यातील २५ ते ५० टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६१, तर ५० ते ७५ टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या ६८ इतकी आहे, तर ७५ ते १०० टक्के पाऊस ५३ तालुक्यांमध्ये झाला आहे.
शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले तालुके
रत्नागिरी १
नाशिक ८
धुळे १
जळगाव ८
नगर १३
पुणे ८
सोलापूर ११
सातारा ९
सांगली १०
कोल्हापूर ३
संभाजीनगर ९
जालना ८
बीड ११
लातूर १०
धाराशिव ८
नांदेड ५ परभणी ८
हिंगोली १
बुलढाणा ९
अकोला २
वाशिम ३
अमरावती ३
यवतमाळ ४
नागपूर १
चंद्रपूर २
विभागनिहाय झालेली पेरणी
विभाग क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये) टक्के
कोकण ०.१३ --३.०९
नाशिक ४.७६--२३.०७
पुणे २.०० -- १८.८
कोल्हापूर १.७२-- २३.५७
संभाजीनगर ११.२९--५४.०१
लातूर ७.५५--२७.३०
अमरावती ५.८६--१८.५६
नागपूर ०.५२--२.७१
एकूण ३३.८३ -- २३.८२