सरासरी किंमती वाढल्या; तरीही घर घेण्यासाठी पुणेकर देशात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 03:31 PM2024-09-24T15:31:04+5:302024-09-24T15:31:50+5:30
घरांच्या किमती सरासरी ३९ टक्क्यांनी वाढल्या असल्या तरीही विक्रीत ३६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात नमूद
पुणे: गेल्या तीन वर्षांपासून देशात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत व राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे शहर अग्रस्थानी आहे. शहरात जानेवारी ते जून या काळामध्ये वेअर हाऊसिंग आणि कार्यालयीन जागांच्या विक्रीत बांधकाम व्यवसाय क्षेत्रात मैलाचा दगड गाठला आहे. त्यामुळे भविष्यात घरांच्या विक्रीसोबतच रोजगाराच्या संधीही वाढतील, अशी निरीक्षणे ‘पुणे हाऊसिंग अहवालात मांडण्यात आली आहेत. घरांच्या किमती सरासरी ३९ टक्क्यांनी वाढल्या असल्या तरीही विक्रीत ३६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कार्यालयीन जागांचा विचार केल्यास पुढील वर्षभरात पुणे हे १०० दशलक्ष क्लबमध्ये प्रवेश करेल. वेअर हाऊसिंग क्षेत्रातदेखील पुणे देशात दुसऱ्या क्रमांकावर असून यामध्ये पुणे शहराने मुंबई, बंगळुरू या शहरांना मागे टाकले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने पुण्यामध्ये ५२० कोटी रुपये किंमत असलेली १६.४ एकर जागा खरेदी केली आहे. तसेच ‘टेस्ला’सारखी कंपनी पुण्यात येत आहे. यामुळे नजीकच्या भविष्यात पुण्यामध्ये कार्यालयीन जागांची मागणी असून यामुळे नोकरीच्या अनेक संधी निर्माण होतील आणि पर्यायाने घरांची मागणी आणखी वाढेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
क्रेडाई, पुणे मेट्रो आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी पुणे हाऊसिंग रिपोर्ट सप्टेंबर २०२४ नुकताच सादर केला. यावेळी क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे, अभिषेक गुप्ता, कपिल गांधी, पुनित ओसवाल, राहुल अजमेरा, हिरेन परमार उपस्थित होते. याबाबत नाईकनवरे म्हणाले, ‘२०१९ च्या पहिल्या सहामाहीसोबत तुलना केल्यास घरांची विक्री ३६ टक्क्यांनी वाढली आहे. तर २०२४ च्या पहिल्या सहामाहीत विक्री झालेल्या घराचे सरासरी मूल्य ७१ लाख रुपये असून २०२० च्या पहिल्या सहामाहीशी तुलना केल्यास हे प्रमाण ३९ टक्क्यांनी वाढले आहे. तरीही इतर शहरांच्या तुलनेने पुणे शहर आजही परवडणारे शहर आहे. गेल्या तीन वर्षांसह यंदाही देशातील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये व राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पुण्याने पहिले स्थान टिकवून ठेवले आहे.’
गुप्ता म्हणाले, ‘मुंबई एमएमआरनंतर पुणे हे देशात सर्वाधिक वेगाने वाढणारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून समोर आले आहे. घरांच्या विक्रीमध्ये पुणे शहर आपले स्थान टिकवून ठेवत असताना वेअर हाऊसिंग आणि कार्यालयीन जागांच्या विक्रीतही जागतिक पातळीवर महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येत आहे.’
‘क्रेडाई’च्या अहवालात महत्त्वाच्या बाबी
- २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांत पुण्यात ३१ हजार कोटींच्या जवळपास ४४ हजार घरांची विक्री.
- गेल्या ५ वर्षांमध्ये घरविक्रीच्या एकूण मूल्यामध्ये तब्बल १६ टक्के इतका लक्षणीय चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर.
- २०२० शी तुलना केल्यास गृहखरेदीदार हे यंदाही आकाराने मोठी घरे घेण्यास इच्छुक.
- बाणेर, म्हाळुंगे, पाषाण, सुस, हिंजवडी, वाकड, ताथवडेमध्ये एकूण विक्रीच्या तब्बल ६० टक्के विक्री.
- आंबेगाव, वारजे, कोथरूड, बावधन भागात घरांच्या सरासरी किमतीत ४४ टक्के वाढ.
- मागील ५ वर्षांत (२०१९-२०२४) शहरात रोजगारामध्ये तब्बल ८ टक्के वाढ.
- ३८ टक्के नागरिक हे ‘ए’ व ‘ए प्लस’ श्रेणीमधील कार्यालयांमध्ये कार्यरत