२९ जिल्ह्यांमध्ये गाठेना पावसाची सरासरी; १३ टक्के कमी पाऊस, मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 09:52 AM2023-09-04T09:52:06+5:302023-09-04T09:52:18+5:30
ज्यातील २९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे...
पुणे : यंदा मॉन्सून सरासरीच्या ९६ टक्के पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज सपशेल फोल ठरला. पहिल्या तीन महिन्यांत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल १३ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यात मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तीव्र दुष्काळाच्या छायेत असून, विदर्भातील सर्व जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. राज्यातील २९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
हवामान विभागाने यंदा मॉन्सूनमध्ये सरासरीइतका पाऊस पडेल, असा अंदाज सुरुवातीला वर्तविला होता. यंदा मान्सूनचा अक्ष हा उत्तरेकडे झुकलेला असल्याने हिमालयालगत धुवांधार पाऊस बरसला. त्याचवेळी दक्षिणेकडील राज्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याचे सुरुवातीचे तीन महिने संपले, तरीही संपूर्ण राज्यात मोजके जिल्हे सोडल्यास पुरेसा पाऊस झालाच नाही. त्याचवेळी सप्टेंबर महिन्यातही पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सर्वाधिक फटका मराठवाड्याला!
मराठवाड्यातील नांदेडवगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे, तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. केवळ पाच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
१ जून ते ३ सप्टेबरपर्यंत राज्यात जिल्हानिहाय पावसाची स्थिती-
सरासरीपेक्षा सर्वाधिक घट असलेले जिल्हे (टक्केवारी) : जालना (- ५१), सांगली (-४४), हिंगोली (-४०), बीड आणि अमरावती (-३९), औरंगाबाद, सातारा आणि अहमदनगर (-३८), अकोला (- ३५), सोलापूर (- ३३), परभणी (-३२), उस्मानाबाद (-३०), धुळे (-२९), बुलढाणा (- २८), नंदुरबार (- २७), गोंदिया आणि वाशिम (-२३), जळगाव (-२१)
कमी पाऊस झालेले जिल्हे : कोल्हापूर आणि वर्धा (-१८), लातूर (-१७), पुणे (-१६), नाशिक आणि नागपूर (-१४), चंद्रपूर (- ११),
सरासरीच्या जवळपास पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : रत्नागिरी (-९), गडचिरोली आणि मुंबई शहर (-६), भंडारा (-५), यवतमाळ आणि सिंधुदुर्ग (-१)
अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : मुंबई उपनगर (२४), ठाणे (२२), पालघर (१७), रायगड (९), नांदेड (१६).