विद्यापीठांमध्ये मराठा विभाग हवा; अविनाश धर्माधिकारी, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:43 AM2017-11-06T11:43:51+5:302017-11-06T11:48:00+5:30
मराठ्यांचा इतिहास सर्वत्र समजण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये मराठा विभाग असला पाहिजे, अशी अपेक्षा माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडलचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
पुणे : सध्या भारताच्या इतिहासाची नियोजन करून तोडफोड करण्यात येत आहे. शिवाजीमहाराज हे सार्या भारताचे होते. शिवाजीमहाराज नसते, तर आपण येथे सापडलो नसतो. त्यामुळे मराठ्यांचा इतिहास सर्वत्र समजण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये मराठा विभाग असला पाहिजे, अशी अपेक्षा माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडलचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या १२३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष गो. बं. देगलूरकर, वक्ते मोहन शेटे, लेखक सुरेश अमोणकर उपस्थित होते. या वेळी कै. आनंद केळकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गौरव पुरस्कार' मोहन शेटे यांना, तर ‘कै. आनंद वैद्य स्मृती पुरस्कार’ लेखक सुरेश अमोणकर (गोवा) यांना धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ३० ग्रंथांना पारितोषिके देण्यात आली व प्रकाशकांनाही सन्मानपत्रे देण्यात आली.
धर्माधिकारी म्हणाले की, ‘मराठी भाषेत जोपर्यंत नवनिर्मिती होत आहे, तोपर्यंत या भाषेला मरण नाही. उत्तम लिखाण करणारी प्रतिभासंपन्न माणसे हीच मराठी भाषा टिकवू शकतील, त्यामुले मराठीचे अस्तित्व कायम राहील.’
विनया देसाई यांनी सूत्रसंचलन केले.