कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसमध्ये अदलाबदली टाळा : आयुष प्रसाद यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:12 PM2021-03-16T19:12:35+5:302021-03-16T19:15:30+5:30
दोन्ही डोस एकाच लसीचे देण्याच्या सूचना
दोन्ही डोस एकाच लसीचे देण्याच्या सूचना : लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीचे फलक लावण्याचे आदेश
पुणे : जिल्ह्यात लसीकरणासाठी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचे ३५ हजार डोस उपलबद्ध झाले आहेत. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांना पूर्वी घेतलेल्या लसीचास डोस देण्यात यावा. लसीच्या डोस मध्ये अदलाबदल टाळण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील लसीकरण केंद्राना दिले आहे. या सोबतच केंद्रावर उलब्ध असलेल्या लसीची माहिती दर्शनी भागात फलकांवर लावन्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोविशिल्ड बरोबरच कोव्हॅक्सिनचीदेखील लस देण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणती लस दिली जाणार, याबाबत लसीकरण केंद्राच्या दर्शनी भागात फलक लावण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून ६० वर्षांवरील वृद्ध नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सुरवात झाली आहे. ११४ केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे. त्यात राज्य शासनाकडून जिल्ह्याला कोविशिल्डचे ५० हजार तर कोव्हॅक्सीनचे ५० हजार डोस असे १ लाख डोस मिळाले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडला त्याचे वाटप करण्यात आले आहेत. लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर कोव्हॅक्सिन लस ही केवळ जिल्हा रुग्णालयामध्येच देण्यात आली. परंतु, लस उपलब्धतेनुसार शहरासह ग्रामीण भागातील इतर केंद्रावर देखील कोव्हॅक्सिन देण्यास सुरूवात केली. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांना सोमवारी ३५ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामधील २० हजार कोविशिल्डचे तर १५ हजार हे कोव्हॅक्सिनचे डोस आहेत.
अनेकांनी पहिला डोस हा कोविशिल्डचा घेतला आहे. तर काहींनी डोस घेतला आहे. दुसरा डोस घेताना संबंधितांनी जी पहिली लस घेतली आहे, त्या लसीचाच डोस त्यांनी दुसऱ्या वेळेच्या कोव्हॅक्सिन लसीकरणाला द्यावा. त्यात अदलाबदल नको असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. यासोबतच नागरिकांना तुम्ही कोणती लस घेत आहात, याची माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय अनेकदा नागरिकांकडून देखील हा प्रश्न विचारला जात असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत लसीकरण केंद्राबाहेर कोणती लस दिली जाणार त्याचे फलक लावण्यास सांगितले आहे.
--