कोरोना संकट टळू दे; माऊलींची वारी पुन्हा सुरू होऊ दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:11+5:302021-07-10T04:09:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नीरा : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शासनाने आषाढी वारीतील पालखी सोहळ्यांना जरी परवानगी नाकारली असली तरी पालखी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा :
कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शासनाने आषाढी वारीतील पालखी सोहळ्यांना जरी परवानगी नाकारली असली तरी पालखी सोहळ्यादरम्यान होणारे विधी स्थानिक लोक प्रतीकात्मकरीत्या साजरे करत आहेत. तिथीनुसार शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यातील मुख्य आकर्षण असलेली नीरा नदीतील स्नान होणार होते. ते पाडेगाव येथील सांप्रदायिक मंडळाने प्रतीकात्मक पादुकास्नान तर नीरेतील महिलांनी नीरामाईची ओटी भरून नदीत पुष्प अर्पण करत जगावरचे हे कोरोना संकट लवकर टळू दे व माऊलींची वारी पुन्हा जोमात सुरू होऊ दे, असे साकडे घातले.
माऊलींचा पालखी सोहळा दर वर्षी आजच्याच दिवशी नीरास्नानासाठी येत असतो. यादरम्यान नीरेच्या महिला नदीची ओटी भरतात. आजही नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी नीरा नदीची खणा-नारळाने ओटी भरली. या वेळी ग्रामपंचायतीच्या सदस्य राधा माने, सारिका काकडे, माधुरी वाडेकर, स्मिता काकडे, वर्षा जेधे यांसह नीरेतील महिलांनी नीरा नदीत पुष्प वाहून माऊलींचा पालखी सोहळा पुढच्या वर्षी तरी नीरा नदीवर येऊ दे, अशी प्रार्थना केली.
नीरा नदीच्या पैलतीरावरील पाडेगाव येथील संप्रदाय क्षेत्रातील लोकांनी व भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी दोनच्या सुमारास प्रतीकात्मक माऊलींच्या पादुका घेऊन आले. विधिवत या पादुकांना नीरा नदीच्या तीरी असलेल्या प्रसिद्ध दत्तमंदिर शेजारील घाटावर माऊली माऊलीच्या गजरात स्नान घालण्यात आले. त्यानंतर दत्त मंदिराच्या सभागृहात आरती करत पुंडलिक वर देव हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, असे म्हणत टाळ्या वाजवण्यात आल्या.
फोटो : १) नीरा नदीची ओटी भरताना नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे व नीरेतील महिला. (छाया : भरत निगडे)
२) पाडेगाव येथील संप्रदाय क्षेत्रातील लोकांनी प्रतीकात्मक पादुकास्नान घातले.