नैवेद्याची नासधूस टाळा, शिधादान करा

By Admin | Published: April 10, 2017 02:03 AM2017-04-10T02:03:42+5:302017-04-10T02:04:33+5:30

हनुमान जयंतीच्या दिवशी येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची यात्रा आहे. या यात्रेमध्ये देवाला नैवेद्य

Avoid dislikes of renovations, rationing, rationing | नैवेद्याची नासधूस टाळा, शिधादान करा

नैवेद्याची नासधूस टाळा, शिधादान करा

googlenewsNext

लोणी काळभोर : हनुमान जयंतीच्या दिवशी येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची यात्रा आहे. या यात्रेमध्ये देवाला नैवेद्य दाखवण्याच्या बाबतीत ग्रामस्थांनी नैवेद्याची नासधूस टाळावी, शिधादान करा, असा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा प्रतिवर्षी हनुमान जयंती व त्याच्या दुसऱ्या दिवशी असे दोन दिवस उत्साहात व भक्तिभावाने साजरी केली जाते. यंदा मंगळवार ११ एप्रिल व बुधवार १२ एप्रिल रोजी ही यात्रा होणार आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच हनुमान जयंतीला गावातील सर्व नागरिक अंबरनाथाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. अंबरनाथ मंदिराबरोबरच
गावातील इतर मंदिरांतही ग्रामस्थ नैवेद्य दाखवतात. त्यासाठी  गावातील प्रत्येक घरातील महिला भगिनी पहाटे उठून स्वयंपाकाची
तयारी करतात. पुरणपोळी, गुळवणी, वरणभात, आमटी, कुरडई, पापड, भजी असा जोरदार मेनू बनवून गावातील सर्व मंदिरांतील देवांना नैवेद्य दाखवला जातो. एका घरात  साधारण पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस, तीस नैवेद्य बनवले जातात.
दुसऱ्या दिवशी पाहुणे मंडळींसाठी सामिष भोजनाचा बेत आखला जातो. ही प्रथा गेली अनेक वर्षे न चुकता सुरू आहे.
मंदिरातील देवांना वाहिलेले हे हजारो नैवेद्य उपयोगात न येता तसेच वाया जातात किंवा बाहेर फेकून दिले जातात.
या प्रथेमध्ये सुधारणा करावी किंवा काही बदल करावा, असा मुद्दा तरुण पिढीतील काही
कार्यकर्त्यांनी गतवर्षीची यात्रा पार पडल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला होता. त्या वेळी या कल्पनेचे भरपूर कौतुक सोशल मीडियामध्ये झाले होते. यंदा यात्रेच्या एक महिना अगोदर याच तरुण पिढीतील  कार्यकर्त्यांनी यात्रेच्या अगोदर
सोशल मीडियामध्ये हा विषय मांडला.  जोडीला गतवर्षी वाया गेलेल्या नैवेद्याचे फोटोही सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केले.
सुरुवातीला तरुण पिढीतील कार्यकर्त्यांच्या काही बैठका झाल्या. त्या नंतर अंबरनाथ देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत हा विषय घेण्यात आला. (वार्ताहर)

या वेळी गावातील ज्येष्ठ मंडळींना तरुण पिढीचा विचार आवडला. त्यांनीही या विषयाला मान्यता दिली. त्यानंतर एक पॅम्प्लेट काढून गावातील सर्व नागरिकांना या विषयी माहिती देण्यात आली. आता हनुमान जयंतीच्या दिवशी पंचवीस तीस नैवेद्य करून ते देवाला अर्पण करण्याऐवजी एकच नैवेद्य तयार करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. गावातील नागरिकांनीही या कल्पनेला पाठिंबा देण्याचे मनापासून ठरवले आहे.
एकच नैवेद्य तयार करून राहिलेल्या नैवेद्यासाठी लागणारे गहू, तांदूळ, हरभरा डाळ, गोडे तेल हे पदार्थ शिधास्वरूपात मंदिरात ठेवलेल्या वेगवेगळ्या भांड्यांत जमा करायचे. त्या नंतर गोळा झालेला हा सर्व शिधा म्हणजेच गहू, तांदूळ, हरभरा डाळ, गोडेतेल एखाद्या अनाथ आश्रमाला दान द्यायचे. यामुळे अन्न वाया जाणार नाही. तसेच परमेश्वर व अनाथ मुले या दोघांचेही आशीर्वाद, दुवा आपल्याला मिळतील असा एक प्रामाणिक हेतू या उपक्रमामागे आहे.

अंबरनाथाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम

लोणी काळभोर : येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, नवरात्रीच्या सातव्या माळेनिमित्त आज मल्हारी मार्तंड व लक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली होती.
लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक यात्रा मंगळवार व बुधवारी साजरी होणार आहे. या निमित्ताने चैत्र नवरात्रीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज सायंकाळी अंबरनाथ व जोगेश्वरी यांना हळद लावण्याचा कार्यक्रम उत्साहात व भक्तिभावात पार पडला. या वेळी अंबरनाथ व जोगेश्वरीची मल्हार मार्तंड व लक्ष्मीरूपात पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा देवाचे पुजारी गणपत भैरवकर यांनी बांधली होती. १२ एप्रिल रोजी पहाटे चार वाजता अंबरनाथ व जोगेश्वरीचा विवाह सोहळा होणार आहे. ११ एप्रिल रोजी रात्री छबिना, मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १२ एप्रिलला पहाटे अमन तांबे यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे.
१२ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा आखाडा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र केसरी पहिलवान राहुल काळभोर यांनी दिली. ते पुढे म्हणाले, या वेळी प्रमुख पंचवीस कुस्त्या होणार आहेत. या पंचवीस कुस्त्यांमधील विजयी मल्लांना तब्बल अकरा लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत, बाला रफिक, सेनादलाचा राष्ट्रीय खेळाडू सोनु कुमार आदी प्रमुख मल्लांच्या कुस्त्या या वेळी होणार आहेत. गावातील व परिसरातील नागरिकांनी आखाड्यास उपस्थित राहून कुस्तीचा आनंद लुटावा, असे आवाहन महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Avoid dislikes of renovations, rationing, rationing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.