इच्छुकांनो, पुणे महापालिकेच्या इमारतीचा, लोगोचा वापर कराल तर सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:19 AM2022-03-26T11:19:28+5:302022-03-26T11:23:55+5:30

पुणे महापालिकेकडून होऊ शकते कारवाई...

avoid logo of the pune municipal building legal action by pmc pune latest news | इच्छुकांनो, पुणे महापालिकेच्या इमारतीचा, लोगोचा वापर कराल तर सावधान!

इच्छुकांनो, पुणे महापालिकेच्या इमारतीचा, लोगोचा वापर कराल तर सावधान!

Next

नीलेश राऊत

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रत्येक प्रभागात विद्यमान व आता माजी झालेल्या नगरसेवकांसह अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. या सर्वांकडून प्रसिद्धीच्या मोहात महापालिकेच्या इमारतीचा फोटो व लोगो आपल्या फलकबाजीत वापरण्यात येत आहे; परंतु वैयक्तिक प्रसिद्धीसाठी करण्यात येणारा हा वापर भावी नगरसेवकांना यापुढे महागात पडणार आहे.

नागपूर महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकाही आता महापालिकेचे नाव, इमारतीचा फोटो व लोगोचा वापर कोणी वैयक्तिक प्रसिद्धीत केला, तर त्यावर कारवाई करण्याचा विचार करीत आहे. विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय विधानसभेचा लोगो अथवा फोटो कोणालाही वापरता येत नाही. तसेच एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारतीचा लोगो व फोटो कोणीही वापरू शकत नाही; मात्र निवडणुकीच्या काळात अनेक इच्छुकांकडून भावी नगरसेवक म्हणून फलकबाजीतून स्वत:ची प्रसिद्धी करताना, महापालिकेच्या इमारतीचा व लोगोचा सर्रास वापर करण्यात येत आहे.

मतदारांना खूश करताना आयोजित केलेल्या उद्घाटन, लोकार्पण, विविध शिबिरांमध्ये महापालिकेचा लोगो वापरला जात असून, महापालिकेच्या नावाचा वापर संबंधितांकडून सोशल मीडियावरही केला जात आहे. महापालिकेच्या लोगोचा व इमारतीचा फोटो असल्यामुळे अनेकांना हा महापालिकेशी संबंधितच कार्यक्रम आहे, असा भ्रम निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेने नुकतेच आदेश जारी करून असा वापर थांबविण्याचे सांगून, लोगो व फोटोचा वापर केल्यास संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याचे अनुकरण आता पुणे महापालिकाही करणार असून, लवकरच तसे आदेश जारी होणार आहेत.

नगरसेवक माजी होण्यास तयार नाहीत

महापालिका सभागृहाची मुदत १४ मार्च रोजी संपुष्टात आल्यावर, १५ मार्चपासून महापालिकेत प्रशासकराज सुरू झाले. त्यावेळी सर्व विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी माजी झाले आहेत; परंतु आजही काही नगरसेवक सोशल मीडियावर स्वत:चा उल्लेख नगरसेवक म्हणून व काही पदाधिकारी आपल्या पदाचा उल्लेख करीत आहेत. यात संबंधित आपल्या पदाअगोदर ‘माजी’ शब्द लिहिण्यास तयार नसल्याचे त्यांच्या प्रसिद्धीतून दिसून येत आहे.

Web Title: avoid logo of the pune municipal building legal action by pmc pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.