सोशल मीडियावर अश्लील, प्रक्षोभक शब्द टाळा अन्यथा अकाउंट होईल ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 03:46 PM2023-02-28T15:46:59+5:302023-02-28T15:48:48+5:30
कोरोना काळात सोशल मीडियाचा वापर हा जवळपास दुपटीने वाढला...
- नम्रता फडणीस
पुणे :सोशल मीडियावर कोणतेही अपमानास्पद, अश्लील, प्रक्षोभक शब्द किंवा शिव्यांची लाखोली वाहणारी कमेंट अथवा कंटेंट पोस्ट करत असाल तर सावधान! तुमच्यावर आर्टिफिशियल इंटिलिजन्सची नजर असून, सातत्याने हे घडल्यास तुमचे अकाउंट तीन दिवस किंवा चोवीस तासासाठी ब्लॉक होऊ शकते. सध्या सोशल मीडियावर पोस्ट किंवा कमेंटमध्ये अशा प्रकारचे शब्द वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. पण अशा नेटिझन्सची अकाउंट काही दिवसांसाठी ब्लॉक केली जात असून, एखाद्या कम्युनिटी बेस ग्रुपवर अशा कमेंट दिसल्यास संबंधित अॅडमिनलादेखील नोटीस पाठवून स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.
सोशल मीडिया हे एक दुधारी शस्त्र मानले जाते. कोरोना काळात सोशल मीडियाचा वापर हा जवळपास दुपटीने वाढला आहे. मात्र, हा मीडिया कशा पद्धतीने हाताळायचा याबाबत अनभिज्ञ असलेल्या लोकांकडून त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. एखाद्या न पटलेल्या पोस्टवर संबंधित व्यक्तीला ट्रोल करून शिव्या देण्याबरोबरच अश्लील किंवा प्रक्षोभक शब्दांचा वापर होताना दिसत आहे. विशेषत: महिलांच्या पोस्टवर कमेंट करताना नेटिझन्स पातळी सोडत आहेत. यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सकडून सोशल मीडियावर कडक नजर ठेवली जात आहे. या शब्दांचा वापर करणाऱ्या नेटिझन्सवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली असून, यापुढील काळात नेटिझन्सना प्रत्येक शब्दाचा तोलूनमापून विचार करीत त्याचा वापर करावा लागणार आहे. बहुतांश नेटिझन्सकडून कमेंट करताना अधिकतर इंग्रजी शब्दांचा वापर केला जातो, पण चुकीचा वापर केलेले इंग्रजी शब्दही तुम्हाला अडचणीत आणू शकतात. उदा: ‘सेक्स’, ‘पॉर्न’, ‘सुसाईड’ ‘हँग’, ‘रेप’ आदी. अशा शब्दांचा सोशल मीडियावर वापर करण्यास बंदी आहे. तसेच लहान मुलांवरील अत्याचाराचे फोटो आणि कटेंटदेखील तपासला जात आहे. त्यामुळे कंटेटमध्ये शब्दाचा वापर करताना खबरदारी घ्या असा सल्ला सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.
यूट्यूबवरही कुणाचेच नियंत्रण नाही
यूट्यूबवर कुणाचेच नियंत्रण नाही. कंटेटच्या दर्जाला नव्हे तर त्याला किती व्ह्यूज मिळतात याला महत्त्व आहे. यातून लोक लाखो रुपये कमवीत आहेत. त्यामुळे तरुणाई यूट्यूबकडे अधिक वळत असल्याचे चित्र आहे.
सोशल मीडियावर अपमानास्पद, अश्लील, प्रक्षोभक शब्द टाळा
मी एका खासगी न्यूज एजन्सीमध्ये काम करतो. डिजिटल कटेंट अपलोड करताना कीवर्ड हॅश्टॅगमध्ये काहीवेळा अशा शब्दांचा वापर करावा लागतो. हे शब्द टाकल्यानंतर सुरुवातीला चोवीस तासांसाठी माझे अकाउंट ब्लॉक करण्यात आले. त्यानंतर माझ्यावर सतत नजर ठेवण्यात आली. माझ्याकडून अशी चूक पुन्हा घडल्याने एकदिवस आणि नंतर तीन दिवसांकरिता माझे अकाउंट ब्लॉक केले. आता हे विशिष्ट बंदी घातलेले शब्द वापरणे मी टाळतो. अकाउंट ब्लॉक केल्यावर तुम्हाला लाइक, कमेंट, शेअर करता येत नाही. तुम्हाला कोणताही मजकूर पोस्ट करता येत नाही.
- आशिष सुभेदार, नोकरदार
इन्स्ट्राग्रामवर कमेंटमध्ये अपमानास्पद (अब्यूझिव्ह) आणि पोर्नोग्राफीक अशा दोन कॅटॅगरी दिल्या आहेत. तसा कटेंट आला आणि कुणी रिपोर्ट केला तर अकाउंट ब्लॉक केले जाते आणि ॲडमिनलादेखील नोटीस पाठवली जाते. सोशल मीडियावर जे डिजिटल क्रिएटर आहेत. त्यांच्यासाठी हे धोकादायक आहे. कंटेट चांगला आहे. पण, कुणी त्या पोस्टवर शिव्या घातल्या किंवा अपमानास्पद, अश्लील शब्दांचा वापर केला तर ती पोस्ट रिपोस्ट होईल.
- रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ.