आरटीई मदत केंद्रातून प्रवेश अर्ज भरण्यास टाळाटाळ : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 07:54 PM2019-03-16T19:54:59+5:302019-03-16T20:02:37+5:30
राज्यातील खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.
पुणे : मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणाºया २५ टक्के मोफत प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी शासनाकडून जिल्हानिहाय मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र पुणे शहरातील अनेक मदत केंद्रांमध्ये पालकांना अर्ज भरून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या प्रवेशासाठी आरटीईच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्चपासून सुरू झालेली आहे.
आरटीई प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी पुणे जिल्हामध्ये ९३ मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या मदत केंद्रांची यादी आरटीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये मदत केंद्राचे नाव, संपर्क पत्ता, समन्वयकांचा मोबाइल नंबर व लँडलाइन फोन नंबर आदी माहिती दिलेली आहे. मात्र या मदत केंद्रातील समन्वयकांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता आरटीई अर्ज भरून देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
मदत केंद्रातील समन्वयक शक्यतो फोन उचलत नाहीत. कोथरूडच्या पंडित दीनदयाळ शाळेतील शिक्षिका अरूणा रजनी यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. औंधच्या इंदिरा प्राथमिक विद्यालयाच्या समन्वयक म्हणून ललिता जाधव या निवृत्त झाल्या असतानाही त्यांचे समन्वयक नाव देण्यात आले आहे. हडपसर गाडीतळ येथील महात्मा फुले विद्यालयाच्या समन्वयकांशी संपर्क साधला असता तुम्ही मुंढव्यात राहत असाल तरच तुमचा अर्ज भरेन, असे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर स्कूलच्या शिवाजी बोखरे यांनीही फोनला कोणताही प्रतिसाद दिला नाही. मदत केंद्रांतील समन्वयकांनी आरटीई प्रवेशासाठी पालकांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यांच्याकडून अर्ज भरण्यास टाळाटाळ केली जात आहे.
शिक्षण विभागाने आरटीई मदत केंद्रावर संगणक, इंटरनेट, प्रिंटर आदी सुविधा उपलब्ध आहेत का याची कुठलीच खातरजमा केलेली नाही. शिक्षकांना आरटीई अर्ज कसा भरायचा याबाबतही नीट माहिती नसल्याचे चित्र काही मदत केंद्रांवर दिसून येत आहे. काही ठिकाणी संगणकामध्ये बिघाड झाला असून सायबर कॅफेत जाऊ अर्ज भरा असा अनाहूत सल्ला दिला जात आहे. त्यामुळे पालकांची मोठी गैरसोय होत आहे.
...................
मदत केंद्रांच्या समन्वयकांकडून हद्दीचा वाद
आरटीई मदत केंद्रातून आरटीईचे अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. त्यामुळे कुठूनही कुठल्याही विद्यार्थ्याचा अर्ज भरता येणे शक्य आहे. मात्र मदत केंद्रातील समन्वयक अर्ज भरण्याचे टाळण्यासाठी हद्दीचा वाद घालत आहेत. तुम्ही राहता ते ठिकाण माझ्या हद्दीत येत नाही असे सांगून मदत केंद्रातील समन्वयकांकडून अर्ज भरण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे पालक हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
....................
शिक्षण संचालक, सहसंचालकांचे दुर्लक्ष
आरटीई मदत केंद्रातून अर्ज भरण्याबाबत पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना याबाबत पालकांनी शिक्षण संचालक सुनिल चव्हाण, सहसंचालक दिनक टेमकर, उपसंचालक मिनांक्षी राऊत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात उपलब्ध झाले नाहीत. ह्यसर एनआयसीमध्ये बैठकीला गेले आहेत एवढे एकच उत्तर त्यांच्या कार्यालयातून दिले जात आहे. शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षामुळेच पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
.................
* बार्टीच्या समतादूतांचे कौतुकास्पद काम
राज्य शासनाच्या मदत केंद्रांमधून अर्ज भरण्यास टाळाटाळ केली जात असतानाच दुसरीकडे बार्टीच्या समतादूतांकडून मात्र शहरातील झोपडपटटयांमध्ये फिरून आरटीईचे अर्ज भरून घेण्याचे कौतुकास्पद काम सुरू आहे. त्यांनी राज्यभरातून आतापर्यंत ११ हजार ३३७ अर्ज पालकांना भरून दिले आहेत. पुणे
शहरातून ७१० आरटीईचे अर्ज भरले गेले आहेत.