नियतकालिकांच्या वितरणाबाबत पोस्टाकडून निर्णयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:10 AM2021-05-06T04:10:58+5:302021-05-06T04:10:58+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावल्यामुळे नियतकालिकांची छपाई आणि वितरण करण्यात अडचणी येत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन असताना ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावल्यामुळे नियतकालिकांची छपाई आणि वितरण करण्यात अडचणी येत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन असताना पोस्ट विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर २०२० पर्यंत नियतकालिकांना पोस्टिंग करण्याबाबत सवलत दिली होती. यंदा मात्र ज्यांनी अंक पोस्ट केलेले नाहीत, अशा प्रकाशकांंना पुढील अंक वाढीव दराने पोस्टिंग करण्याच्या व दंड लागणार असल्याच्या नोटिसा पोस्टाकडून मिळत आहेत.
अ. भा. मराठी नियतकालिक परिषदेने यासंदर्भात गेल्या एक महिन्यापासून दिल्ली येथील पोस्ट संचालक, महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल आणि पुणे क्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल यांना निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप त्यावर काहाही निर्णय मिळत नसल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस भालचंद्र कुलकर्णी, अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील यांनी दिली.
कोरोनाची परिस्थिती वाढत असल्याने अनेक प्रिंटिंग प्रेस बंद आहेत, कागद उपलब्ध होत नाहीत, बांधणी यंत्रणा बंद आहेत याचा विचार करता अनेक प्रकाशकांना अंक तयार करता येत नाहीत. त्यामुळे गेल्या महिन्यात एप्रिलचा अंक छापला गेला नाही आणि तशीच परिस्थिती याही महिन्यात आहे.
पोस्टाच्या नियमांनुसार अंक छापला गेला नसल्यास त्यापुढील अंकाला सवलत मिळत नाही. जोडअंक काढण्यास वर्षातून एकदाच परवानगी मिळते, दिलेल्या तारखेसच अंकांचे पोस्टिंग होणे आवश्यक असते, तारीख बदलून घेणे अशा अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना प्रकाशकांना सध्या करावा लागत असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत देशभरात सुमारे दीड लाख नियतकालिके रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स ऑफ इंडिया यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मराठीसह सर्व भाषांतील नोंदणीकृत असलेली सुमारे २० हजार नियतकालिके आहेत, ज्यामध्ये सुमारे २ हजार दैनिके व १८ हजार अन्य नियतकालिके नोंदणीकृत आहेत. प्रत्यक्षात महाराष्ट्रातून सुमारे ४ हजार आणि त्यापैकी सुमारे एक हजार मराठी नियतकालिके पुणे शहरातून प्रसिध्द होत आहेत, तर सुमारे ६०० नियतकालिकांना पोस्टाचा सवलतीचा परवाना असल्याची माहिती यावेळी कुलकर्णी यांनी दिली.