भोसरी जमीन घोटाळ्याच्या ‘झोटिंग अहवाला’ची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:06+5:302021-07-17T04:10:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन घोटाळा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीन घोटाळा प्रकरणी नेमलेल्या झोटिंग आयोगाचा अहवाल आमच्यापर्यंत अजून आलेलाच नाही. त्यामुळे झोटिंग आयोगाने खडसे यांच्यावर ठपका ठेवल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात विधानसभेत केलेले वक्तव्य आजही रेकॉर्डवर आहे, अशी पुस्तीदेखील त्यांनी जोडली.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि. १६) पत्रकारांशी बोलत होते. झोटिंग आयोगाच्या चौकशी अहवालात खडसे यांच्यावर ठपका असल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, झोटिंग आयोगाचा अहवाल अजून सरकार पुढेच आलेला नाही. मग अहवालात काय आहे हे तुम्हाला कोणी सांगितले? अहवाल आल्यावरच त्यात काय म्हटले आहे हे समोर येईल.
चौकट
चॅनेलवाल्यांनो किती खोट्या बातम्या द्याल?
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्यास संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पवार म्हणाले, ‘काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांबरोबर माझी चर्चा झाली.’ ‘मी नाराजी व्यक्त केली,’ अशा स्वरूपाची बातमी मलाच चॅनेलवर बघायला मिळाली. या संदर्भात मी आणि मुख्यमंत्री भेटलो देखील नाही किंवा चर्चादेखील केली नाही. तरीदेखील खोट्या बातम्या दिल्या गेल्या. चॅनेलवाल्यांनो, खोट्या बातम्या देऊ नका,” असे अजित पवार म्हणाले.