कलावंतांच्या जागविल्या आठवणी
By admin | Published: April 26, 2016 01:25 AM2016-04-26T01:25:02+5:302016-04-26T01:25:02+5:30
राजकारण्यांपेक्षा ते एक मनस्वी कलावंत होते. त्यांच्या हृदयाचा एक कोपरा कलावंतांसाठी सदैव ठेवलेला असायचा़ त्यांना शारदेचे वरदान होते.
पुणे : राजकारण्यांपेक्षा ते एक मनस्वी कलावंत होते. त्यांच्या हृदयाचा एक कोपरा कलावंतांसाठी सदैव ठेवलेला असायचा़ त्यांना शारदेचे वरदान होते. जातीपातींपलीकडे जाऊन त्यांनी राजकारण केले, व्यंगचित्रांच्या ताकदीवर त्यांचे नेतृत्व उभे केले़ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक भाषणांचे संकलन असलेल्या ‘विचाराचं सोनं’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले़
या वेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ़ नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि़ द़ फडणीस, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या आठवणी जागविल्या़
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून त्या वेळी वाद झाला होता़ त्या वेळी मी पक्षाची काय भूमिका, असे त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले होते, की सन्मान मागायचा नसतो; मिळवायचा असतो़ जिथपर्यंत पुरुषांना जायची परवानगी आहे, तिथपर्यंत महिलांनाही परवानगी असायला हवी़ आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे़’’
फडणीस म्हणाले, ‘‘एखाद्या सामान्य चित्रकाराने आपले व्हिझिटिंग कार्ड मातोश्रीवर पाठविले तरी त्याला लगेच प्रवेश मिळत असे़ त्यांच्या कुंचल्याचा प्रभाव जास्त होता़ ‘मार्मिक’मधून काढलेल्या व्यंगचित्रांतून त्यांचे नेतृत्व जन्माला आले़’’
बर्गे म्हणाले, ‘‘बाळासाहेबांच्या सुरक्षेची जबाबदारी असताना ते जो नाश्ता करीत तोच आम्हा पोलिसांनाही दिला जातोय ना, याकडे त्यांचे लक्ष असे़ सुरक्षेविषयी एखादी गोष्ट त्यांना सांगितली, तर तिचे ते पालन करीत़ गोरेगाव येथील सभा पोलिसांनी सांगितलेल्या धोक्याची जाणीव करून देताच त्यांनी रद्द केली होती़’’
साहित्य दरबारच्या मनीषा धारणे यांनी स्वागत केले़ पुस्तकाचे संपादक हर्षल प्रधान यांनी मनोगत व्यक्त केले़ मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले़
(प्रतिनिधी)
महाराष्ट्रात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोनच स्वयंप्रकाशित नेते आहेत़ बाकीचे नेते दिल्लीचा प्रकाश पडला, की दिसतात.
- रामदास फुटाणे