जनजागृती-संवादाद्वारे वाहनचालकांचे प्रबोधन - अशोक मोराळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:13 AM2017-08-11T02:13:09+5:302017-08-11T02:13:09+5:30

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी स्वयंशिस्त, यंत्रणांमधील समन्वय आणि उत्तम व्यवस्थापन आवश्यक असल्याचे मत वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.

Awakening of drivers through public awareness-communication - Ashok Morale | जनजागृती-संवादाद्वारे वाहनचालकांचे प्रबोधन - अशोक मोराळे

जनजागृती-संवादाद्वारे वाहनचालकांचे प्रबोधन - अशोक मोराळे

googlenewsNext

पुणे आणि पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या ५७ लाखांच्या घरामध्ये गेली आहे. दोन्ही शहरांमध्ये मिळून ५0 लाख वाहने आहेत. वाहतूक शाखेकडे १४00 कर्मचारी आहेत. सव्वाचार हजार वाहनचालकांमागे एक पोलीस कर्मचारी असे विसंगत प्रमाण आहे. जनसंवाद, जनजागृतीद्वारे प्रबोधन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच पेपरलेस आणि कॅशलेस दंडवसुली सुरू करण्यात आलेली आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी स्वयंशिस्त, यंत्रणांमधील समन्वय आणि उत्तम व्यवस्थापन आवश्यक असल्याचे मत वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना व्यक्त केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये लोकसंख्यावाढीसोबत वाहनांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. दोन्ही शहरांमध्ये ५0 लाख वाहने आहेत. यामध्ये ३४ लाख दुचाकी असून, आॅटोरिक्षांचे प्रमाणही मोठे आहे. दोन महापालिका, दोन कॅन्टोन्मेंट, १0 ते १२ ग्रामपंचायती या शहरांमध्ये येतात. सोळा उड्डाणपूल, १६१ मंगल कार्यालये, २७0 पेक्षा अधिक शाळा यासोबतच महाविद्यालये, हिंजवडी आयटी पार्क, नवीन टाऊनशिप हे हमखास वाहतूककोंडी होणारे भाग आहेत.
दोन्ही शहरांत मिळून साडेबाराशे चौक आहेत. त्यातील केवळ ३६१ चौकांमध्येच सिग्नल आहेत. शहरामध्ये केवळ ६५ ठिकाणी मान्यताप्राप्त वाहनतळ आहेत. जवळपास १00 अधिकारी आणि १४00 कर्मचारी दररोज वाहतूक नियमनाचे काम करीत असतात. पोलिसांना मदत करणाºया वॉर्डन्सची सेवाही पालिकेने बंद केल्याने आणखीनच ताण आला आहे. रस्ता या समस्येचा कळीचा मुद्दा आहे. सर्व रस्त्यांची रुंदी अतिशय कमी आहे. रस्त्यांवरून धावणारी वाहने आणि उपलब्ध जागा याचे प्रमाण विसंगत झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. पदपथांवर वाढत चाललेल्या अतिक्रमणांमुळे पादचाºयांना रस्त्यावरून चालत जावे लागते. पर्यायाने वाहनचालकांना आणखी कमी रस्ता उपलब्ध होतो. कुठे खड्डा पडला, झाड पडले तरी कोंडी होते. सर्वसाधारणपणे दिवसाला ७ ते ८ पीएमपी बसेस रस्त्यामध्ये बंद पडल्याने वाहतूककोंडी होते. रोड इन्फ्रास्ट्रक्चर, रोड इंजिनिअरिंग अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचाही गांभीर्याने विचार केला जात नसल्याचे चित्र आहे.
वाहतूक पोलिसांना नियमन आणि दंडवसुली करावी लागते. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी केलेल्या सूचना आणि उपाययोजनांची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी जनसंवाद, जनजागृती मोहिमा घेतल्या जातात. नुकतेच पोलिसांनी रक्षाबंधन कार्यक्रम चौकाचौकांत घेतले. ढोलताशा महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी जनजागृतीसाठी मदत केली. सेल्फी विथ यमराज, मानवी साखळी असे अभिनव उपक्रमही राबविण्यात आलेले आहेत. आरएसपीच्या माध्यमातून शाळांमधून प्रबोधन करण्यात येत आहे. वाहतूक सल्लागार बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.
मी स्वत: विविध भागांमध्ये जाऊन लोकप्रतिनिधी, नागरिकांशी संवाद साधत असल्याचे उपायुक्त मोराळे यांनी सांगितले. यासोबतच पालिका आणि अन्य यंत्रणांसोबत समन्वय ठेवला जात आहे. साडेबाराशे सीसीटीव्हींच्या माध्यमातून नियंत्रण कक्षामधून शहराच्या वाहतुकीवर लक्ष ठेवले जात आहे. जनजागृतीसाठी ६ व्हिडीओ क्लिप्स ३९ सिनेमागृहांमध्ये दाखविण्यात येत आहेत. दररोज सीसीटीव्हीच्या माध्यमातून अडीच हजार आणि ई-चलान मशीनद्वारे साडेतीन हजार केसेस केल्या जात आहेत.
त्यामुळे हे व्यवहार पेपरलेस आणि कॅशलेस झाले आहेत. गेल्या सात महिन्यांत ८ लाख ३८ हजार ३८८ केसेसमध्ये १८ कोटी ९५ लाख २३ हजार ७00 रुपयांची दंडवसुली करण्यात आलेली आहे. ३८४ ठिकाणी नो पार्किंग झोन, २५१
पी वन पी टू, १00 एकेरी वाहतूक, १८६ ठिकाणी जड वाहनांना बंदी केलेली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात येणाºया अ‍ॅडाप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंटचा उपयोग होणार आहे. नागरिकांच्या सूचना, अभिप्राय यांचे स्वागत आहे. उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचा वापर करून वाहतुकीचे परिणामकारक व्यवस्थापन आणि नियमन करण्यात येत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी नागरिकांची साथ आणि स्वयंशिस्त अतिशय गरजेची आहे.

Web Title: Awakening of drivers through public awareness-communication - Ashok Morale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.