जर्मनीत भारतीयत्वाचा जागर, मराठी संस्कृतीचा गजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 07:48 PM2019-09-18T19:48:28+5:302019-09-18T19:50:04+5:30
भारताच्या जर्मनीतील राजदूतांच्या कल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते..
पुणे : जर्मनीत गेल्या आठवड्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भारतीय संस्कृतीचा असा शानदार जागर करण्यात आला. 'मराठी पाऊल पडते पुढे...' या उक्तीनुसार दोन्ही कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रीय मंडळी आघाडीवर होती. या कार्यक्रमांच्या आयोजनामागे भारताच्या विविध प्रांतातील शाकाहारी खाद्यसंस्कृतीचे दर्शन जर्मन नागरिकांना घडवावे आणि तिथे नोकरी-व्यवसायानिमित्त आलेल्या भारतीयांना गावाकडचे पदार्थ चाखायला मिळावेत, असा दुहेरी हेतू त्यामागे होता. भारतीय संस्कृतीच्या वैविध्यपूर्ण दर्शनाने आपल्याच घरी पाहुणे म्हणून आलेले जर्मन नागरिकही भारावून गेले.
जर्मनीची राजधानी बर्लिन इथे भारतीय दूतावासाने खाद्य महोत्सव आयोजित केला होता. निमित्त होते शिवरायांचा जन्मोत्सव व गणेश महोत्सव . भारताच्या जर्मनीतील राजदूत सौ. मुक्ता दत्त तोमर यांच्या कल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मराठी गडी बेभान होऊन लेझीम खेळले. तुळजामातेच्या नावाने 'गोंधळ' घालण्यात आला. डोळ्यांचे असे पारणे फिटले. मन तृप्त झाले. . अस्सल भारतीय चवीच्या विविध खाद्यपदार्थांचे 10-12 स्टॉल या महोत्सवात होते.त्यात चटकदार वडा-पाव, झणझणीत मिसळ, मधुर श्रीखंड, खमंग पाव-भाजी... कुणी दिल्लीच्या चाटवर ताव मारला, कुणी गुजराती गाजर हलवा नि पात्रा चाखला. कुणाला बिहारी लिट्टी-चोखा आवडून गेली, तर कुणाला चविष्ट सांबारात बुडी मारलेला मेदूवडा आणि इडली हवीहवीशी वाटली. अशा नानाविध चविष्ट पदार्थांना खवय्यांनी उदार अंतकरणाने उदरस्थ केले!
भारताच्या राजदूत तोमर म्हणाल्या, दोन्ही देशांचे नागरिक जवळ येण्यास आणि त्यांच्यातील सुसंवाद वाढण्यास यातून मदत होते. जर्मनी व भारत यांचे फार पूर्वी पासून चांगले संबंध आहेत. अशा कार्यक्रमांमुळे ते वृद्धिंगत होतात व दोन्ही देशांतील वीण अधिक मजबूत होते. महोत्सवात स्टॉल लावणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
या खाद्यमहोत्सवात सर्वाधिक लक्षवेधी ठरला स्टॉल क्रमांक 4 - बर्लिनच्या मराठी मित्र मंडळाचा स्टॉल. मूळच्या नगरच्या सुवर्णा ओंकार कलवडे यांनी बनविलेल्या खमंग वडा-पाववर पाहुणे खूश झाले. अन्य मराठी पदार्थही त्यांना आवडले. महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून उद्योजक ओंकार कलवडे, रोहित प्रभू, अन्विता प्रभू, अमोल सैनिस, केतकी सैनिस, शैलजा पाटील, दीपक पाटील, शिरीष पंडित आदी आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करीत होते. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व मराठमोळे पदार्थ या सर्वांनी स्वत:च्या घरी बनवले होते. गोड, आंबट, मसालेदार, चमचमीत, झणझणीत... असे पन्नासहून अधिक पदार्थ इथे चाखायला मिळाले. सोबत होते थंडगार कोकम सरबत.
गणेशवंदना सादर झाल्यावर जमलेल्या सर्वांनीच मोठ्या उत्साहाने 'गणपतीबाप्पा मोरया' असा गजर केला! कथक, भरतनाट्यम्, गरबा, भांगडा अशी नृत्ये, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत असे विविध बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आले. मराठी व भारतीय मंडळी दूरदूरवरून या महोत्सवासाठी आली होती. त्यांची गर्दी, गाणी, आनंद, उत्साह यामुळे कार्यक्रमाला एखाद्या लग्नसोहळ्याचे स्वरूप आले आणि सारे व?्हाडी अर्थातच तृप्त झाले.
...............
फ्रँकफर्टचा 'फेस्ट'!
दूतावासातील खाद्यमहोत्सवाच्या आदल्याच दिवशी, म्हणजे 31 आॅगस्ट रोजी फ्रँकफर्ट येथील रोझ मार्केटमध्ये 'इंडियन फेस्ट'चे आयोजन करण्यात आले होते. फ्रँकफर्ट येथे स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींनी तेथे 2014पासून 'मराठी कट्टा' सुरू केला आहे. सारे कट्टेकर या फेस्टमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. मराठमोळ्या पदार्थांचा खास स्टॉल होता आणि त्याच्यासमोर उभी केलेली भरजरी गुढी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. चटकदार शाकाहारी-मांसाहारी पदार्थ खाऊन आणि मसाला चहा, मँगो लस्सी पिऊन सर्वांनीच कट्ट्याची वाहवा केली.
फेस्टनिमित्त मराठी कट्टाने उद्योजकांसाठी एक वेगळा उपक्रम हाती घेतला होता. जर्मनीत उद्योग-व्यवसाय सुरू केलेल्या मराठी माणसांची माहिती सर्वांना मिळावी, त्यांना आपल्या व्यवसायाची माहिती सर्वांना देता यावी, यासाठी खास स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. अहमदनगरच्या ओंकार चंद्रकांत कलवडे यांचा स्टॉल तेथे होता. त्यांनी पाच वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये 'मॅट्रिक्स स्ट्रक्चर्स'ची मुहूर्तमेढ रोवली. त्याची मुख्य शाखा वेर्निंगरोड येथे असून, दुसरी शाखा अहमदनगर येथे सुरू करण्यात आली आहे.
........