सजग पुणेकरही लोकसहभागात उदासीन

By admin | Published: August 20, 2016 05:30 AM2016-08-20T05:30:59+5:302016-08-20T05:30:59+5:30

महापालिकेच्या वतीने दरवर्षी नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी प्रत्येक प्रभागाकरिता ५० लाखांचा निधी राखून ठेवला जातो. मात्र गेल्या ७ वर्षांपासून निम्म्यापेक्षाही जास्त निधी शिल्लक

Awakening Puneer too depressed in the public welfare | सजग पुणेकरही लोकसहभागात उदासीन

सजग पुणेकरही लोकसहभागात उदासीन

Next

- दीपक जाधव, पुणे

महापालिकेच्या वतीने दरवर्षी नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी प्रत्येक प्रभागाकरिता ५० लाखांचा निधी राखून ठेवला जातो. मात्र गेल्या ७ वर्षांपासून निम्म्यापेक्षाही जास्त निधी शिल्लक राहून लॅप्स होत आहे. सजग, चौकस व जागरूक नागरिक अशी ओळख असलेल्या पुणेकरांकडून त्यांच्या हक्काचा निधी शिल्लक राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेला प्रत्येक बाबतीत धारेवर धरणाऱ्या स्वयंसेवी संस्थाही याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी आॅगस्ट महिन्यामध्ये जाहिरात प्रकाशित करून नागरिकांना त्यांच्या प्रभागात करावयाची कामे सुचविण्याचे आवाहन केले जाते. या कामांसाठी प्रत्येक प्रभागासाठी ५० लाख याप्रमाणे एकूण ३७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. पुढील २०१७-१८ या वर्षाच्या अंदाजपत्रकासाठी कामे सुचविण्याचे निवेदन पालिकेच्या वतीने देण्यात आले आहे. येत्या ९ सप्टेंबर २०१७ पर्यंत नागरिकांना यासाठी लेखी सूचना पालिकेकडे करता येणार आहेत. मात्र, नागरिकांच्या उदासीनतेमुळे गेल्या ७ वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक राहत असल्याचे दिसून येत आहे.
आपल्या प्रभागातील नेमके प्रश्न काय आहेत. त्यासाठी कोणत्या सेवा, सुविधा आवश्यक आहेत याची चांगली जाण स्थानिक नागरिकांना असते. त्यामुळे त्यांनी महापालिकेला त्यानुसार कामे सुचवातीत. त्यांचाही सहभाग अंदाजपत्रक तयार करताना राहावा यासाठी सहभागी अंदाजपत्रकाची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयामार्फत हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांनी लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतर प्रभाग समितीच्या अध्यक्षांखाली बैठक घेतली जाते. नागरिकांच्या सूचनांनुसार कामांचा प्रारूप आराखडा तयार केला जातो. प्रभाग समितीने मान्यता दिलेल्या कामांचा आयुक्तांकडून मुख्य अंदाजपत्रकामध्ये समावेश केला जातो. प्रामुख्याने पदपथ, पाणीपुरवठा, गटारे आदी कामांना प्राधान्य दिले जाते.

नगरसेवकांकडून कामे होत नाहीत अशी तक्रार अनेकदा नागरिकांकडून केली जाते. मात्र, त्यांच्या हक्काचा निधी मात्र खर्च केला जात नाही. महापालिकेतील चुकीच्या बाबींवर स्वयंसेवी संस्था, संघटनांकडून अनेकदा टीका केली जाते. मात्र नागरिकांनी अंदाजपत्रकामध्ये सहभाग नोंदवावा यासाठी त्यांच्याकडून फारसे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. त्याचबरोबर महापालिकेकडूनही दरवर्षी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रकाशित करून केवळ सहभागी अंदाजपत्रकाचा उपचार उरकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. आयुक्तांनी सहभागी अंदाजपत्रकाबाबत विशेष लक्ष देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते; मात्र त्यावर कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

नागरिकांना करता येणार ९ सप्टेंबर २०१६ पर्यंत सूचना
- पुढील वर्षाच्या २०१७-१८ या वर्षातील सहभागी अंदाजपत्रकाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नागरिकांना ९ सप्टेंबर २०१६ पर्यंत आपल्या प्रभागात कोणती कामे करावीत, याच्या लेखी सूचना क्षेत्रीय कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- प्रभाग समितीची बैठक होऊन या कामांना मान्यता दिली जाईल. त्यानंतर आयुक्तांकडून या कामांचा अंदाजपत्रकात समावेश होईल. नागरिकांनी कामे सुचविण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

वर्षसुचविलेली कामेप्रत्यक्षात खर्च
२००७-०८१७.६२ कोटी११.३२ कोटी
२००८-०९२७.२७ कोटी२०.७५ कोटी
२००९-१०३५ कोटी२१.६२ कोटी
२०१०-११३०.१६ कोटी१६.५५ कोटी
२०११-१२३४.७३ कोटी२३.२८ कोटी
२०१२-१३२६.२४ कोटी१६.६७ कोटी
२०१३-१४२९.५२ कोटी१८.९२ कोटी

- जाहिरात प्रकाशित करून नागरिकांना प्रभागात करावयाची कामे सुचविण्याचे आवाहन केले जाते.

Web Title: Awakening Puneer too depressed in the public welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.