मतदानाविषयी वाढतेय तरुणाईत जागृती
By admin | Published: January 25, 2016 01:03 AM2016-01-25T01:03:46+5:302016-01-25T01:03:46+5:30
मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल.
पुणे : मतदान करणे हा लोकशाहीतील सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करणे आवश्यक आहे. कारण एका बहुमूल्य मतदानाने भारतीय लोकशाही अधिक बळकट होईल. हा विचार प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचविला जातो तसेच अशा अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून व सोशल मीडियाद्वारे देखील मतदानाविषयी जागृती केली जाते. याचा परिणाम व तरुणांचा उत्साह पाहता गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आज १८ ते ३० वयोगटातील मतदान १० टक्क्यांनी वाढलेले दिसते, अशी माहिती उपनिवडणूक अधिकारी समीक्षा चंद्राकार यांनी दिली.
मतदानाविषयी जनजागृतीसाठी व तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंडळाच्या बैठकीत २५ जानेवारी हा दिवस मतदान दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. तसेच मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान करणे ही लोकशाहीची ताकद असते. अशा विविध विषयांवर अनेक महाविद्यालयांत मतदान हक्काविषयी व्याख्याने आयोजित करण्यात येतात. तसेच या माध्यमातून तरुण मतदारांमध्ये जागृती निर्माण करून त्यांना मतदान करण्याचे महत्त्व कळावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
काही सुशिक्षित वर्गामध्ये एका मताने काय फरक पडणार, हा विचार मनात बाळगून मतदानचा दिवस हा सरकारी सुट्टी म्हणून साजरा करतात. तर काही जण बाहेरगावी सहलीचा बेत आयोजित करतात. मग हाच वर्ग, मतदान न करता चुकीचे सरकार निवडून आले आहे, भ्रष्टाचार वाढत आहे असे अनेक प्रश्न या नागरिकांना पडतात. या गोष्टी टाळण्यासाठी जर प्रत्येकाने मतदाराने योग्य हक्क बजावून आणि योग्य उमेदवाराला निवडून दिले तर अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. जनतेच्या मतदानावर योग्य शासन ठरते. शेवटी जनताच सर्वश्रेष्ठ असते. कायद्याने १८ वर्षांपुढील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे.