Maharashtra: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

By रोशन मोरे | Published: July 24, 2023 05:54 PM2023-07-24T17:54:25+5:302023-07-24T17:56:09+5:30

जिल्हास्तरीय विजेत्यांसाठी निवड समिती...

Awards from Govt to Outstanding Public Ganeshotsav Mandals; Applications can be made till 'this' date | Maharashtra: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

Maharashtra: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

googlenewsNext

पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या उपक्रमामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातून ३ गणेशोत्सव मंडळाची निवड व शिफारस समितीमार्फत राज्य शासनाकडे करण्यात येईल.

सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड दहा निकषांच्या आधारे करण्यात येईल. १० निकषांसाठी एकूण १५० गुणांक आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूकर सजावट, ध्वनीप्रदुषणविरहीत वातावरण, समाजप्रबोधनात्मक सजावट/देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट/देखावा, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य, शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुण देण्यात येणार आहेत.

येथे करा अर्ज
शासन निर्णयातील परिशिष्टानुसार अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे. ८ सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय विजेत्यांसाठी निवड समिती
जिल्हास्तरीय विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी अध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे सदस्य असतील. अर्ज केलेल्या मंडळांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून मंडळाकडून छायाचित्रीकरण करुन तसेच कागदपत्रे जमा करून गुणांक देण्यात येतील. पुणे जिल्ह्यातून ३ गणेशोत्सव मंडळाची निवड व शिफारस समितीमार्फत राज्य शासनाकडे करण्यात येईल.

Web Title: Awards from Govt to Outstanding Public Ganeshotsav Mandals; Applications can be made till 'this' date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.