जागरूक काँग्रेस राज्यघटनेत बदल होऊ देणार नाही : सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:53+5:302021-07-26T04:10:53+5:30
पुणे : सर्व जाती-धर्मातील लोकांना समान वागणूक देणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे काँग्रेस पक्षाने आजवर संरक्षण केले आहे. अलीकडच्या काळात राज्यघटनेमध्ये ...
पुणे : सर्व जाती-धर्मातील लोकांना समान वागणूक देणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे काँग्रेस पक्षाने आजवर संरक्षण केले आहे. अलीकडच्या काळात राज्यघटनेमध्ये छेडछाडीचे काही प्रयत्न होत आहेत. मात्र, काँग्रेस पक्ष राज्यघटनेबाबत जागरूक असून, राज्यघटनेत कोणताही बदल आम्ही होऊ देणार नाही. राज्यघटनेच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही कायम पार पाडू, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव दिवंगत डॉ. विकास आबनावे यांचे स्थापन करण्यात आलेल्या ''डॉ. विकास आबनावे फाउंडेशन''चे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी शिंदे बोलत होते़ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, संस्थेचे मानद अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, संचालक प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, दिलीप आबनावे, गौरव आबनावे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे यांच्या हस्ते फाउंडेशनच्या लोगोचे अनावरण आणि संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.
शिंदे म्हणाले, वंचित समाजातील आबनावे परिवाराने शैक्षणिक संस्था उभारून शिक्षणाचे दालन उघडे केले, हे मोलाचे कार्य आहे. डॉ. विकास आबनावे यांनी आपल्या दूरदृष्टीने काम करत या संस्थेला नावारूपास आणले. समाजिक, राजकीय चिंतनाला आध्यात्मिक विचारांची जोड त्यांनी दिली.
उल्हास पवार यांनी एका संस्थेत तेवढ्याच श्रध्देने चार पिढ्या कार्यरत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले़ तर रामदास फुटाणे यांनी आबनावे कुटुंब अनेक पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. त्याचे फळ आगामी काळात आबनावे यांना मिळावे अशी भावना व्यक्त केली. अरुण खोरे यांनी प्रास्ताविक केले. जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले. मोहन जोशी यांनी आभार मानले.
------------------
फोटो मेल केला आहे़