एकाच छताखाली दाेन हजारांहून अधिक मुलं, मुलींमध्ये करण्यात अाली मासिक पाळीबाबत जागरुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 07:30 PM2018-12-17T19:30:36+5:302018-12-17T19:31:41+5:30
पुण्यातील केंद्रीय विद्यालयामध्ये भारतात पहिल्यांदाच तब्बल दाेन हजार मुलं, मुली तसेच पुरुष अाणि महिलांमध्ये स्त्रियांच्या मासिक पाळीविषयी जनजागृती करण्यात अाली.
पुणे : पुण्यातील केंद्रीय विद्यालयामध्ये भारतात पहिल्यांदाच तब्बल दाेन हजार मुलं, मुली तसेच पुरुष अाणि महिलांमध्ये स्त्रियांच्या मासिक पाळीविषयी जनजागृती करण्यात अाली. मदरहुड हाॅस्पिटल, स्फुरल फाऊंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. हा कार्यक्रम गिनीज बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्डस मध्ये नाेंदविण्याचा प्रयत्न करण्यात अाला.
या कार्यक्रमात मदरहुड हाॅस्पिटलच्या डाॅ. राजेश्वरी पवार यांनी विद्यालयातील दाेन हजाराहून अधिक लाेकांना मासिक पाळी, स्वच्छता, मासिक पाळी बाबतची मिथके याबाबत मार्गदर्शन केले. हा उपक्रम गिनीज बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्डसमध्ये नाेंदविण्यात अाला अाहे. या उपक्रमात किशाेरवयीन मुली, मुले, पुरुष अाणि महिला एकत्रितपणे मासिक पाळी अाणि स्वच्छता याबद्दल बाेलण्यासाठी एकत्रित अाले. स्फुरल फाउंडेशनच्या डाॅ. गीता बाेरा म्हणाल्या, मासिक पाळीबाबत जगात उघडपणे बाेलले जात नाही हे धक्कादायक अाहे. केवळ भारतात 23 दशलक्ष मुली दरवर्षी मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापन सुविधांच्या अभावामुळे अाणि स्वच्छता नॅपकिन्सच्या उपलब्ध हाेत नसल्याने शाळेतून बाहेर पडतात.
केन्द्रीय विद्यालय क्रमांक 2 एएफएस पुणेचे मुख्याध्यापक संजय कुमार पाटील यांनी सर्वांचे अाभार मानले.